सोलापूर -दरोडा टाकून लूटमार करण्याच्या तयारीत असलेल्या आंतरराज्य दरोडेखोरांना सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये पोलिसांना धारदार शस्त्रे व सोन्या-चांदीचा ऐवज आढळला आहे. हे दरोडेखोर विजापूर रोडवरील एका सोन्याच्या दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत होते. या कारवाईमुळे सोलापुरात होणारा दरोडा रोखला गेला आहे.
हेही वाचा -मुंबई-पुणे महामार्गावर ट्रक चालकाला रिव्हॉल्वर दाखविणारे 24 तासात जेरबंद
आरोपींची नावे
जयलिंग कैलास काळे(वय 33 वर्ष),अमित महादेव उर्फ शंकर चव्हाण (वय 36) (दोघे रा. लिपणगाव, धनगरवस्ती, श्रीगोंदा, अहमदनगर), सुनील विठ्ठल पिंगळे (वय 48,रा. गुरुधनुरा, ता. गंगापूर, औरंगाबाद), रवींद्र धनसिंग पवार (वय 45 रा. कुमार तळ, ता. जामखेड, जि. अहमदनगर), या संशयित दरोडेखोरांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. तर, दोन दरोडेखोर पळून जाण्यात यशस्वी झाले आहे.
दरोडा घालण्याच्या तयारीत होते
गुन्हे शाखेचे पोलीस रेकॉर्डवरील संशयित चोरट्यांचा शोध घेत होते. काही संशयित हे बॉम्बे पार्कजवळील एका मोकळ्या जागेत हत्यारांसहित तोंडावर कापड बांधून थांबले आहेत, अशी माहिती पोलिसांनी मिळाली. गुन्हे शाखेच्या पथकाने त्या ठिकाणी जाऊन या सर्व संशयित आरोपींना ताब्यात घेतले. यामध्ये दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले. बाकीच्या संशयित दरोडेखोरांना अटक करून सर्व हत्यारे जप्त केली आणि सोन्या चांदीचा ऐवजदेखील जप्त केला.
सिनेस्टाईल पाठलाग करून कारवाई
गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दरोडेखोरांना सिनेस्टाईल पाठलाग करून अटक केले. या कारवाईमध्ये पीएसआय संदीप शिंदे, हवालदार दिलीप नागटिळक, विद्यासागर मोहिते, गणेश शिंदे, सागर गुंड, सोमनाथ सुरवसे, आरती यादव, रफिक इनामदार, विजय निंबाळकर आदींनी पोलीस कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी केली.
हेही वाचा -धक्कादायक..! विहिरीत पडलेल्या कारमध्ये आढळला कुजलेला मृतदेह; मृत व्यक्ती २०१९ मध्ये बेपत्ता?