सोलापूर Solapur Ganeshotsav: सर्वांच्या लाडक्या बाप्पाचं आज घराघरात मोठ्या जल्लोषात स्वागत होत आहे. ठिकठिकाणची सार्वजनिक मंडळ देखील बाप्पाच्या आगमनासाठी सज्ज झाली आहेत. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सार्वजनिक गणेशोत्सवाला अनन्यसाधारण महत्व आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील लोकमान्य टिळकांनी आजोबा गणपतीची प्रेरणा (Tilak Took Inspiration Ajoba Ganapati) घेऊन स्वातंत्रपूर्व काळात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला, असे सांगण्यात येते. म्हणजेच आपल्या देशातील सर्वात पहिला सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे श्री श्रद्धानंद समाजाचा सार्वजनिक आजोबा गणपती आहे.
मानाचा आजोबा गणपती १३८ वर्षांचा: सोलापुरातील मानाच्या आजोबा गणपतीला आज १३८ वर्ष पूर्ण झाली आहेत. लोकमान्य टिळकांनी १८९४ साली विंचूरकर वाड्यातून (Vinchurkar Wada) सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली होती. इंग्रजांच्या जुलमी राजवटी विरोधात धार्मिक कार्यक्रमातून भारतीय एकता दाखवणे आणि इंग्रजाचा बिमोड करणे, हा त्यामागचा उद्देश होता. म्हणून स्वातंत्र्यपूर्व काळात सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात झाली. लोकमान्य टिळक यांच्या प्रेरणेने सार्वजनिक गणेशोत्सव ठिकठिकाणी सुरू झाला. लोकमान्य टिळकांनी एका कार्यक्रमात गणेशोत्सव कार्यक्रम एक दिवस ऑलम्पिकच्या बरोबरीने जगभर साजरा होईल, असे बोलून दाखवले होते.
आजोबा गणपतीचा इतिहास : भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळात सोलापुरातील आजोबा गणपती मंडळ हे इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी संघटित शक्ती देत होते. लोकमान्य टिळक हे १८८५ साली सोलापूरला आले होते. लोकमान्य टिळक आणि सोलापुरातील प्रसिध्द उद्योगपती आप्पासाहेब वारद यांच्यात घनिष्ट मैत्री होती. टिळक हे सोलापूर येथे आल्यावर वारद यांच्या घरी वास्तव्य करत होते. जुन्या फौजदार चावडी जवळील श्रद्धानंद समाजाचे पसारे यांनी आपल्या घरी टिळकांना पान सुपारीसाठी आमंत्रित केले होते. अप्पा वारद आणि टिळक हे शुक्रवार पेठेतील आजोबा गणपती (Shukrawar Peth Ajoba Ganapati) व गणेशोत्सव समारंभात पान सुपारीला गेले आणि त्या कार्यक्रमात एकत्रित येणारे नागरिकाना पाहून लोकमान्य टिळकांना सार्वजनिक गणेशोत्सवाची कल्पना सुचली, असे जुन्या पिढीतील लोकांकडून सांगितले जाते. त्यानंतर १८९४ सालापासून लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला.