सोलापूर -केंद्र सरकारने गॅसच्या सबसिडीपोटी नागरिकांच्या खात्यात केवळ 1 रुपये 38 पैसे जमा केले आहेत. त्यामुळे सोलापूर काँग्रेसच्या संतप्त पदाधिकाऱ्याने आपली वर्षभराची गॅस सबसिडी पोटी मिळणाऱ्या एकूण 16 रुपये 56 पैशांचा धनादेश पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावे दिला आहे. केंद्र सरकारकडून दिवसेंदिवस होणारी गॅसची दरवाढ आणि त्याचबरोबर कमी होत चाललेली सबसिडी याविरोधात सोलापूर शहर काँग्रेसच्यावतीने अनोख्या पध्दतीने आपला निषेध नोंदवण्यात आला.
सोलापूर शहर काँग्रेस प्रमुख यांची प्रतिक्रिया एकीकडे लॉकडाऊनमधून आताच सुटका होत असतानाच दुसरीकडे महागाईने सर्वसामान्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. त्यातच आता गॅस सबसिडीबाबतही नागरिकांत मोठी नाराजी पसरली आहे.
16 रुपयांचा चेक -
केंद्र सरकारने गॅसच्या सबसिडीपोटी नागरिकांच्या खात्यात केवळ 1 रुपये 38 पैसे जमा केले आहेत. त्यामुळे सोलापूर काँग्रेसच्या संतप्त पदाधिकाऱ्याने आपली वर्षभराची गॅस सबसिडी पोटी मिळणाऱ्या एकूण 16 रुपये 56 पैशांचा धनादेश पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावे दिला आहे. सोलापूर शहर काँग्रेसचे सचिव प्रा. राहुल बोळकोठे यांनी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात हा चेक देवून आपला कृतीशील निषेध नोंदवला आहे. विशेष म्हणजे ही रक्कम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या सेंट्रल विस्टा या नव्याने निर्माण होणाऱ्या निवासस्थानासाठी किंवा आपल्या इतर कोणत्याही प्रकल्पासाठी वापरावी, असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला आहे.
मोदींना पाठवला 16 रुपयांचा चेक हेही वाचा -Modi Cabinet Expansion : नारायण राणे, कपिल पाटील, डॉ. भागवत कराड, भारती पवार मोदींच्या मंत्रिमंडळात, 43 मंत्र्यांनी घेतली शपथ
घरगुती वापराचे गॅसदर हजारच्या वर -
एकीकडे कोरोनामुळे लाखो लोकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली असतानाच दुसरीकडे देशात महागाई गगनाला भिडली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे मुश्किल झाले आहे. तेल, गॅस, पेट्रोल विविध प्रकारच्या डाळींचे भाव आवाक्याबाहेर गेल्याने देशात महागाईचा आलेख उंचावला आहे. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मोदी सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसप्रणित युपीए सरकारच्या काळात पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी महागाईवर नियंत्रण ठेवले होते. त्यांच्या काळात 400 रुपयांना मिळणारे सिलेंडर आता हजारी पार गेले आहे. त्यामुळे मोदी सरकारच्या धोरणाविरोधात आम्ही आपला निषेध व्यक्त केल्याचेही प्रा. बोळकोठे यांनी सांगितले.