महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सोलापूर विद्यापीठाला 5 लाखाची मदत, बार्शीच्या शिवाजी संस्थेने दिली मदत - Shivaji Institute of Barshi donated Rs 5 lakh to the university

महामहीम राज्यपाल कार्यालय यांच्यावतीने आयोजित यंदाच्या 23 व्या राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवाचे यजमानपद पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाला मिळाले आहे. राज्यस्तरीय विद्यापीठ क्रिडा महोत्सवाच्या खर्चासाठी बार्शीच्या शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाकडून विद्यापीठाला तब्बल पाच लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे.

सोलापूर विद्यापीठाला 5 लाखाची मदत, बार्शीच्या शिवाजी संस्थेने दिली मदत

By

Published : Nov 17, 2019, 5:20 AM IST

सोलापूर -पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाला बार्शीच्या शिवाजी शिक्षण संस्थेकडून 5 लाख रूपयाची आर्थिक मदत देण्यात आली आहे. सोलापूर विद्यापीठात होणाऱ्या राज्यस्तरीय क्रिडा स्पर्धेसाठी आर्थिक मदत म्हणून हे पाच लाख रूपये देण्यात आले आहेत.


महामहीम राज्यपाल कार्यालय यांच्यावतीने आयोजित यंदाच्या 23 व्या राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवाचे यजमानपद पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाला मिळाले आहे. राज्यस्तरीय विद्यापीठ क्रिडा महोत्सवाच्या खर्चासाठी बार्शीच्या शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाकडून विद्यापीठाला तब्बल पाच लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे.


बार्शीच्या शिवाजी शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यापीठात येऊन कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्याकडे पाच लाख रुपये मदतीचा धनादेश सुपूर्द केला. याप्रसंगी शिवाजी शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रकाश पाटील, खजिनदार दिलीप रेवडकर, कार्यकारिणी सदस्य सोपान मोरे, शशिकांत पवार, शिवाजी कॉलेजचे प्राचार्य डॉ. प्रकाश थोरात यांची उपस्थिती होती.


डिसेंबर महिन्यात राज्यस्तरीय क्रीडा महोत्सव विद्यापीठात पार पडणार आहे. सध्या विद्यापीठ प्रशासनाकडून याची तयारी सुरू आहे. यावेळी कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी शिवाजी शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले. यामुळे विद्यापीठाला मोठी मदत झाल्याचेही त्यांनी सांगितले.


विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी तसेच चांगले खेळाडू तयार करून बलशाली राष्ट्र बनविण्यासाठी दरवर्षी महाराष्ट्र शासनाच्या कुलपती कार्यालयाच्यावतीने राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले जाते. यामध्ये राज्यातील कृषी व इतर विद्यापीठातील विद्यार्थी खेळाडू संघांचा समावेश असतो. यंदाचा 2019 या वर्षाचा क्रीडा महोत्सव सोलापूर विद्यापीठात पार पडणार आहे. पुढील डिसेंबर महिन्यात हा महोत्सव होईल. महोत्सवाच्या वित्तीय खर्चाबाबत आढावा घेण्यासाठी महामहिम राज्यपाल नियुक्त समिती सदस्य डॉ. गोविंद कतलाकोटे यांनी शनिवारी विद्यापीठास भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यापीठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या बैठकीस क्रीडा महोत्सव समिती सदस्य डॉ. प्रदीप देशमुख हे उपस्थित होते.


या क्रीडा महोत्सवात कबड्डी, खो-खो, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, अॅथलेटिक्सच्या स्पर्धा होणार आहेत. यामध्ये मुले व मुली या दोन्ही संघांचा समावेश असेल. या स्पर्धांमध्ये राज्यातील एकूण 20 विद्यापीठाच्या संघांचा सहभाग असणार आहे. सुमारे तीन हजार स्पर्धक यात सहभागी होतील, असा अंदाज आहे. त्यादृष्टीने विद्यापीठाकडून सध्या तयारी सुरू करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details