सोलापूर -राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे आज पंढरपुरात येणार आहेत. सहकारातील ज्येष्ठ नेते माजी आमदार सुधाकर परिचारक, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष राजूबापू पाटील आणि प्रसिद्ध कीर्तनकार रामदास महाराज जाधव (कैकाडी) यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांची पवार सांत्वनपर भेट घेणार आहेत. माजी आमदार सुधाकर परिचारक यांना शरद पवार यांनी सोलापूर जिल्ह्यातून मोठी ताकद निर्माण करून दिली होती. पवारांनीही परिचारकांवर एसटी महामंडळाच्या रूपाने मोठी जबाबदारी दिली होती. मात्र, 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर मैत्रीचे संबंध कमी होताना दिसले. त्यानतर सुधाकरपंत परिचारक हे राजकारणापासून अलिप्त राहू लागले होते. मात्र 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीत परिचारकांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराविरोधात निवडणूक लढवली होती. तरीही शरद पवारांनी परिचारकांविरोधात थेट टीका टिप्पणी केली नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पंढरपूर दौऱ्यावर - शरद पवार सोलापूर बातमी
माजी आमदार सुधाकर परिचारक, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष राजूबापू पाटील आणि प्रसिद्ध कीर्तनकार रामदास महाराज जाधव (कैकाडी) यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांची पवार सांत्वनपर भेट घेणार आहेत.
राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष राजूबापू पाटील यांचे कोरोनामुळे निधन झाले. पाटील हे शेवटपर्यंत राष्ट्रवादीशी आणि पवारांच्या विचारांशी प्रमाणिक राहिले होते. रामदास महाराज आणि शरद पवार यांचे गेल्या अनेक वर्षांपासून अगदी जवळचे संबंध होते. रामदास महाराजांच्या अनेक धार्मिक कार्यक्रमांना शरद पवारांनी हजेरी लावली होती. कोरोनाच्या साथीमुळे पंढरपूर तालुक्यातील राजकीय आणि अध्यात्मिक क्षेत्रातील अनेक दिग्गजांचा मृत्यू झाला आहे. या सर्वांचे शरद पवारांशी नेहमीच जवळचे संबंध राहिले होते.