सोलापूर - दुभत्या जनावरांचा विचार करून तरी सरकारने चारा द्यावा, अशी भावनिक विणवणी सांगोला तालुक्यातील मंगवडे येथील आजीबाईने सरकारला केली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सांगोल्याच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी येथील जनतेच्या गाठीभेठी घेतल्या असता, जनावरांसाठी चिंतित झालेल्या आजीबाईंनी पवारांसमोर आपल्या भावना व्यक्त केल्या.
पशुपालक आजीची सरकारला विणवणी दुभत्या जनावरांचे वासरू जेंव्हा आईच्या कासेला येऊन चिकटते, तेव्हा कासेत दूधच नसते. मग ते पिणार काय? अशी भयावह परिस्थिती निर्माण झाली असल्याची खंतही या आजीबाईनी पवारांसमोर व्यक्त केली आहे.
सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळाचे चटके मोठ्या प्रमाणावर बसत आहेत. मागील अनेक दिवसापासून जनावरांच्या चाऱ्यासाठी चारा छावण्या सुरू करण्याची मागणी असताना देखील सरकारने तब्बल सहा महिन्याचा वेळकाढूपणा केला. आता पंधरा दिवसापूर्वी चारा छावण्या सुरू केल्या आहेत. या चारा छावण्यांमध्ये सुद्धा दुभत्या जनावरांना देण्यात येणारा १५ किलो चारा हा खूपच कमी असून दुभत्या जनावरांचा विचार करून तरी सरकारने चारा द्यावा, अशी भावनिक साद मंगवडे येथील आजीबाईने शरद पवार यांच्यासमोर घातली.
खासदार शरद पवार यांनी लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर दुष्काळी भागाची पाहणी करण्यासाठी सांगोला व मंगळवेढा तालुक्याचा दौरा आयोजित केला होता. यावेळी शरद पवार यांनी मंगेवाडी गावातील चारा छावणीमध्ये जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली, यावेळी चारा छावणीत जनावरे घेऊन आलेल्या आजीबाईने दुष्काळाची परिस्थिती पवार यांच्यासमोर मांडली.
दुभत्या जनावरांना फक्त १५ किलो चारा देण्यात येत असल्यामुळे पाच लिटर दूध देणारी जनावरे ही आता दोन लिटरवर आली आहेत. एवढ्या मोठ्या जनावराला सरकार फक्त पंधरा किलो चारा आणि ४०० ग्रॅम पेंड देत आहे. दुभत्या जनावराला हा चारा खूपच कमी असून सरकारने दुभत्या जनावरांचा विचार करून चारा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
६५० शेततळी असलेल्या अजनाळे गावात दुष्काळाच्या झळा
दुष्काळाची दाहकता लक्षात आल्यानंतर या गावातील तरुण शेतकऱ्यांनी पुढाकार घेत त्यावेळी शरद पवार यांची भेट घेतली. पवारांनी या गावाला फळबागांसाठी प्रोत्साहन दिले. गावातील तरुण शेतकऱ्यांनी डाळिंबाची लागवड करून कोट्यावधी रुपये कमवले जे शेतकरी १९७२ ला रोजगार हमीच्या कामावर गेली होती त्यात शेतकऱ्यांची आता टोलेजंग बंगला उभारले आहेत. या गावातील गावकऱ्यांना पाण्याचे महत्त्व पटल्यामुळेच अजनाळे गावात तब्बल ६५० शेततळी आहेत, मात्र आताच्या भयावह दुष्काळामध्ये एकाही शेततळ्यात थेंबही पाणी शिल्लक राहिलेले नाही. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्यातील दुष्काळाची भयानक दिसून येते दुष्काळी परिस्थिती पाहून राज्याचे मुख्यमंत्री व केंद्र सरकारला दुष्काळाची जाणीव करून देण्यात येईल अशी माहिती ती शरद पवार यांनी यावेळी दिली.