सोलापूर- शहर आणि जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांसाठी रेमडेसिवीरचे 75 इंजेक्शन राष्ट्रवादी वेल्फेअर फंडातून दिले जात असल्याची माहिती माजी शहराध्यक्ष महेश गादेकर यांनी बोलताना दिली. ही इंजेक्शन शासनामार्फत रुग्णांना दिले जाणार असल्याची माहिती यावेळी बोलताना गादेकर यांनी दिली. एकीकडे मोठे मेडिकल दुकानधारक, मेडिकल होलसेल औषध विक्रेते विविध कंपन्याकडे रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी ऑर्डर देऊन वाट पाहत आहेत तर दुसरीकडे मात्र राजकीय व्यक्तींना सहज उपलब्ध होत आहेत.
रेमडेसिवीर इंजेक्शनचा सोलापुरात गुजरात पॅटर्न
रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा देशभरात निर्माण झाला आहे. रुग्णांचे नातेवाईक रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी भटकंती करत आहेत. यावेळी गुजरात येथील सुरत जिल्ह्यातील उधाना परिसरात असलेल्या भाजप कार्यालयात रेमडेसिवीर इंजेक्शन मोफत वाटप करण्यात आली. यावेळी रुग्णांच्या नातेवाईकांनी लांब रांगा लावून इंजेक्शनसाठी कसरत केली. तसाच पॅटर्न सोलापुरात दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वेल्फेअर फंडातून शरद पवार यांनी सोलापुरातील नागरीकांसाठी रेमडेसिविर इंजेक्शन पाठविली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष महेश गादेकर यांनी माहिती दिली. ही इंजेक्शन प्रशासकीय अधिकऱ्यांमार्फत दिली जाणार असल्याची देखील माहिती दिली.