सोलापूर - लोकसभा उमेदवारीवरुन माढा मतदारसंघात सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. वातावरण बघून सर्वच राजकीय नेतेमंडळी निर्णय घेताना दिसत आहेत. माढा मतदारसंघातून कोण निवडणूक लढवणार हा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. नुकतेच राष्ट्रावादीतून भाजपवासी झालेले रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपमधून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. तर भाजपपुरस्कृत सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय मामा शिंदे हे आज राष्ट्रवादी काँग्रसेमध्ये प्रवेश करत आहेत. त्यामुळे एकेकाळाचेहे दोन्ही पवारांचे शिष्य आमने सामने येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढ्यातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर मावळमधून पार्थ पवार लढणार असल्याने एकाच घरातील ३ उमेदवार नको म्हणत तरुणांना संधी देणार असल्याचे सांगत पवारांनी माढ्यातून माघार घेतली. त्यानंतर माढ्यातून विजयसिंह मोहिते पाटील लढणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, विजयसिंह मोहिते पाटील यांनी आपले पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी मागितली होती. मात्र, माढा मतदारसंघातील आमदारांचा रणजितसिंहांच्या नावाला विरोध होता. त्यामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवारीच्या दोन याद्या जाहीर होऊनही मोहिते पाटीलयांचे नाव त्यामध्ये नव्हते. अखेर रणजितसिंह मोहिते पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपचे कमळ हाती घेतले.