महाराष्ट्र

maharashtra

पेट्रोल- डिझेल दरवाढीविरोधात सांगोला तालुका काँग्रेसचे निवेदन

By

Published : Jul 4, 2020, 11:42 AM IST

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाच्या किमती कमी होत असताना भारतामध्ये पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढणे हे अन्यायकारक आहे, असे सांगोला काँग्रेसने म्हटले आहे. गेले महिनाभर इंधन दरात वाढ करणाऱ्या केंद्र सरकारचा सांगोला काँग्रेसने निषेध केला आहे.

sangola congress submit memorandum to magistrate
पेट्रोल-डिझेल दरवाढी विरोधात सांगोला काँग्रेसचे निवेदन

सांगोला(सोलापूर)-आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाच्या किमती कमी होत असताना भारतामध्ये पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढणे हे अन्यायकारक आहे. फक्त उत्पन्न वाढीचा विचार करून सर्वसामान्य जनतेच्या जीवाशी खेळ करणाऱ्या केंद्र सरकारचा सांगोला तालुका काँग्रेसने निषेध केला. सध्या झालेली पेट्रोल व डिझेल दरवाढ केंद्र सरकारने त्वरित मागे घ्यावी, यासंबंधीचे निवेदन सांगोला तालुका काँग्रेसच्यावतीने तहसीलदारांना देण्यात आले.

सध्या भारतासह संपूर्ण जगावर कोरोना महामारीचा प्रभाव असताना भारतामध्ये गेल्या महिन्याभरापासून पेट्रोल व डिझेलच्या किमती मध्ये सतत वाढ होत आहे. अगोदरच कोरोना महामारीमुळे सर्व व्यवसाय उद्योग बंद असल्याने सामान्य जनता खचलेली आहे. त्यातच भरीस भर म्हणून केंद्र सरकारकडून पेट्रोल व डिझेलच्या किमती सतत वाढवल्या जात आहेत. याचा फटका सामान्य जनतेला बसत आहे. असे निवेदनात म्हटले आहे.

कोरोना महामारीच्या काळात लॉकडाऊन मुळे अनेकांचे रोजगार गेलेले आहेत. तसेच अनेक लोकांच्या उत्पन्नात कमालीची घट झाली आहे. शेतकरी देखील निसर्गाच्या लपंडावामुळे हतबल झाला आहे. अशावेळी पेट्रोल व डिझेल च्या किमती वाढत असल्याने सामान्य जनता व शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात फटका बसू लागला आहे. विशेषता डिझेलच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने संसारोपयोगी तसेच शेतीसंबंधी घटकांच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते, अशावेळी सामान्य जनतेसमोर जगावे की मरावे असा गहन प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्व गोष्टींचा सारासार विचार न करता केंद्राकडून दररोज पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये वाढ होत आहे,असेही निवेदनात म्हटले आहे

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य प्राध्यापक प्रबुद्ध चंद्र झपके यांच्या मार्गदर्शनानुसार हे आंदोलन करण्यात आले. यावेळी सांगोला तालुका काँग्रेस अध्यक्ष राजकुमार पवार, शहर अध्यक्ष तोहित मुल्ला, नगरसेविका सौ.अनुराधा खडतरे, जिल्हा महिला काँग्रेस उपाध्यक्ष सौ मैनाताई बनसोडे, सौ.सुमित्रा लोहार, सुरेश डांगे,काशीनाथ ढोले,संजय रायचुरे,विजय वाघमारे,युवराज लोहार आदी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details