पंढरपूर -मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जी निलंबनाची कारवाई केली. ही कारवाई अपेक्षितच होती. पक्षाला कोणत्याही प्रकारे अडचणीत आणण्याचा आपला हेतू नव्हता. मात्र शिवसेना पक्षप्रमुखकडून जी निलंबनाची कारवाई केली आहे. ती आपल्याला मान्य असल्याची स्पष्टोक्ती शिवसेनेच्या निलंबित महिला आघाडी प्रमुख शैलजा गोडसे यांनी दिली.
महाविकास आघाडीचा धर्म न पाळल्यामुळे कारवाई
पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भालके यांच्याविरोधात अपक्ष अर्ज दाखल केला म्हणून शिवसेना महिला आघाडी प्रमुख शैलजा गोडसे यांची शिवसेनेमधून हकालपट्टी करण्यात आली. महाविकास आघाडीमध्ये पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा ही राष्ट्रवादी काँग्रेसची सोडण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेना पक्षाकडून भगीरथ भालके यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे.
जनतेच्या आग्रहाखातर निवडणूक रिंगणात
शैला गोडसे म्हणाल्या की, शिवसेना पक्षप्रमुख यांची निलंबनाची कारवाई अपेक्षितच होती. पक्षाला अडचणीत आणण्याचा कोणताही हेतू नव्हता. मात्र महिला प्रमुख म्हणून काम करत असताना शिवसेना घराघरात पोचवण्याचे काम मी केले आहे. शिवसेना पक्षाकडून जिल्ह्यांमध्ये मोठ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. त्यामुळे शिवसेनेचे चांगले काम करू शकले. 2019 साली शिवसेना पक्षाकडून आपल्याला निवडणूक लढवण्यासाठी तिकिट देण्यात आले होते. मात्र त्यावेळी जागा मित्रपक्षाला गेल्यामुळे पक्षाकडून माघारी घेण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र आत्ताची पोटनिवडणूक ही जनतेच्या आग्रहाखातर लढवणार आहे.