पंढरपूर (सोलापूर)- महसूल विभाग कोरोनाच्या संकटामुळे उपाययोजना करण्यासाठी राबवत असल्याने वाळू चोरट्यांचे फावले होते. यामुळे पंढरपूर तालुक्यातील व्होळे येथे महसूल विभागाने आता वाळू माफियांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. तालुक्यातील भीमा नदीपात्रातून वाळूची चोरी करून वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर व एक जेसीबी महसूलच्या पथकाने पकडले आहे. ही कारवाई आज (दि. 26 जुलै) सकाळच्या सुमारास करण्यात आली.
पंढरपुरात भीमाकाठी वाळू माफियांवर महसूल विभागाची धडक कारवाई - पंढरपूर महसूल विभाग कारवाई बातमी
पंढरपूर तालुक्यातील व्होळे येथे आज सकाळी महसूल विभागाने वाळू माफियांवर कारवाई केली आहे. या कारवाईत महसूल विभागाने दोन ट्रॅक्टर व एक जेसीबी पकडले आहे.
व्होळे परिसरातून जवळपास 20 लाख रुपये किंमतीचा 80 ब्रास वाळूसाठा, एक जेसीबी, दोन ट्रक महसूल विभागाकडून झालेल्या कारवाईत जप्त करण्यात आला आहे. अजूनही शेतातून मोठ्या प्रमाणात छापेसत्र सुरु आहे.
व्होळे गावातील भीमा नदीपात्रातून ट्रॅक्टरव्दारे वाळूची अवैध वाहतूक केली जात असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली होती. त्यानुसार मंडळ अधिकारी समीर मुजावर, तलाठी प्रशांत शिंदे, एम. डी. पाटील, राजेंद्र वाघमारे, कैलास दुरसनगे, शिवशरण कटारे कर्मचाऱ्यांच्या पथकाने छापा टाकत ही कारवाई केली.
पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सध्या बेकायदा वाळू उपसा विरोधात धडक मोहीम सुरु केली आहे. यातूनच या गावावर ही कारवाई आज सकाळच्या सुमारास करण्यात आली. या धडक कारवाईमुळे चोरटी वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांना मोठा तडाखा बसला आहे.