सोलापूर -शहरातील सुंदरमनगर येथे होमगार्ड प्रशिक्षण केंद्राची इमारत आहे. 35 वर्ष जुन्या असलेल्या या इमारतीचा कायापालट करण्यात सोलापूर ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांना यश आले आहे. होमगार्ड प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीचे नुतनीकरणामुळे कार्यालयीन कारभारातही सुसूत्रता आली आहे. आमदार प्रणिती शिंदे यांच्या आमदार फंडातून या इमारतीचे नुतनीकरण करण्यात आले आहे.
सोलापूर होमगार्ड प्रशिक्षण केंद्र - अतुल झेंडे यांचा पाठपुरावा -
सुंदरमनगरजवळ येथील जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालय आणि जिल्हा प्रशिक्षण केंद्र होमगार्ड या इमारतीचे बांधकाम हे सन १९८६ मध्ये झाले होते. त्यानंतर मागील काही वर्षापासून इमारतीची बरीच पडझड झाली होती. होमगार्ड प्रशिक्षण केंद्राचा कारभार चालणाऱ्या या इमारतीमध्ये मुलभूत सोयी-सुविधांचा अभाव होता. त्यामुळे कार्यालयीन कामकाज करणाऱ्या अधिकाऱ्यांची गैरसोय होत होती. मात्र, अतुल झेंडे यांनी ही बाब लक्षात घेऊन इमारतीसाठी सोलापूर जिल्हा नियोजन समिती यांच्या माध्यमातून आमदार प्रणिती शिंदे यांच्या पाठपुराव्यातून नुतनीकरण करण्यात आले.
जिल्ह्यातील होमगार्डना आपल्या कार्यालयीन कामानिमित्त शहरातील सुंदरमनगर येथे यावे लागत होते. कार्यालयामध्ये सोयी-सुविधा नसल्यामुळे गैरसोय होत होती. जुन्या इमारतीचे नुतनीकरण झाल्यामुळे व कार्यालयांत सोयी-सुविधा मिळाल्यामुळे पुरुष व महिला होमगार्डना दिलासा मिळाला आहे.
- जिल्हा होमगार्ड कार्यालयाचे रूप पालटले
आमदार प्रणिती शिंदे यांच्या आमदार निधीमधून जिल्हा होमगार्ड कार्यालयास तत्काळ अद्ययावत चार संगणक संच व चार प्रिंटर पुरविल्याने कार्यालयीन कामकाजामध्ये सुसूत्रता आली आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त परिसरात १०० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, आमदार प्रणिती शिंदे, शहर पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडकर, महानगरपालिका उपायुक्त धनराज पांडे, जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण अतुल झेंडे, दीपिका झेंडे, जिल्हा परिषद मुख्य लेखाधिकारी अजयसिंग पवार, नगरसेवक सुनीता रोटे, वृक्षप्रेमी प्रल्हाद काशीद उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी रा.पो.नि. काजुळकर, जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालयाचे प्रशासकीय अधिकारी बी. पी. घाडगे, रा.पो. उपनिरीक्षक काटे, जिल्हा होमगार्ड कार्यालयाचे विक्रांत मोरे, स. फौ. दळवे आदी उपस्थित होते.