सोलापूर- लॉकडाऊननंतर अनलॉकमध्ये महामार्गावर वाहने धावू लागली आहेत. महामार्गावर असलेल्या टोल प्लाझावर वाहनांची गर्दी वाढली आहे. फास्टॅग नोंदणी कमी झाली असल्याने रोख स्वरूपात टोल रक्कम देऊन जाणारे अधिक वाहने धावत आहेत. त्यामुळे टोल प्लाझावर ताण वाढला आहे आणि वाहने देखील धिम्या गतीने पुढे सरकत आहेत. लॉकडाऊनमध्ये 26 मार्च ते 20 एप्रिलपर्यंत टोल बंद झाले होते. 20 एप्रिलपासून पुन्हा टोल वसुली सुरू झाली. परंतु कडक लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवांमधील वाहनांना परवानगी असल्याने तुरळकच वाहने धावत होती. अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्यापासून महामार्गावर वाहनांची संख्या वाढू लागली आहे. पण आजदेखील 80 टक्के वाहने महामार्गावर नाहीत. फक्त 20 टक्के वाहने महामार्गावर धावत आहेत. सद्यस्थितीत रोज किती रुपयांची टोल वसुली होती, याबाबत विचारणा केली असता टोल अधिकाऱ्यांनी ही माहिती देता येत नाही, असे सांगितले.
'ईटिव्ही भारत'शी बोलताना राष्ट्रीय महामार्ग क्र-65 प्रोजेक्टचे मॅनेजर इंद्र प्रताप सिंग यांनी सांगितले की, कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी कॅशलेस सुविधा उत्तम मार्ग आहे. परंतु कॅशलेस किंवा फास्टॅग (fastag) सुविधा घेण्यास नागरिक पुढे-मागे करतात. कॅश टोल देऊनच पुढे जाण्यास भलाई समजत आहेत. राष्ट्रीय महामार्ग विभागाने फास्टॅग (fastag) असल्याशिवाय वाहने सोडू नका, असा ही आदेश 2019 मध्ये काढला होता. परंतु त्याची अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. फास्टॅग सिस्टीम ही पूर्णतः ऑनलाइन आहे. वाहन धारकाच्या बँक खात्यातून ही रक्कम आपोआप वजा होते. परंतु अनेक वाहनधारकांनी फास्टॅगकडे पाठ फिरवली आहे.
फास्टॅग म्हणजे इलेक्ट्रॉनिक टोल संग्रह प्रणाली -
देशाच्या प्रत्येक महामार्गावर फास्टॅग प्रणालीला अधिक प्राधान्य दिले जात आहे. ही सिस्टीम ऑनलाइन असल्याने कार, जीप, आयशर, ट्रक, बस यांना या प्रणाली अंतर्गत वाहने हाकता येऊ शकतात. फास्टॅग भारत एक इलेक्ट्रॉनिक टोल संग्रहण प्रणाली आहे, ज्याचे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाद्वारे संचालित केले जाते. वाहनांच्या काचेवर एक चिप बसविली जाते. त्या संबंधित टोलवर इलेक्ट्रॉनिक अँटीना लावलेला असतो. वाहन टोल प्लाझावर आल्या बरोबर हा अँटीना वाहनावरील चिपला कनेक्ट होऊन वाहनास जाण्याची परवानगी देतो. यामुळे टोलवर वाहतूक कोंडी कमी होते आणि वाहन धारकांना ताटकळत थांबावे लागत नाही. यात वेळेची बचत होते. तसेच परतीचा टोल फक्त फास्टॅग पास धारकांना देण्यात आला आहे. फास्टॅगची नोंदणी करताना वाहनधारकांना आपल्या बँक बचत खात्यासोबत जोडणी करावी लागते. यामुळे टोल प्लाझावर वाहन आल्याबरोबर बँक खात्यातून रक्कम वजा होते. याचा आणखीन एक फायदा म्हणजे वाहन चोरीस गेले असता, चोरीचे वाहन फास्टॅग द्वारे त्याचा शोध सोप्या पद्धतीने लावला जाऊ शकतो.