महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 10, 2020, 9:43 PM IST

Updated : Feb 10, 2020, 11:45 PM IST

ETV Bharat / state

'माजी विद्यार्थ्यांच्या निधीतून दरवर्षी तीनशे विद्यार्थ्यांना बक्षीस'

श्री दिगंबर जैन गुरुकुल शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी जवळपास अडीच लाखांचा निधी जमा करुन ती बँकेत मुदत ठेवीवर ठेवली. त्यातून मिळणाऱ्या व्याजाच्या पैशातून शाळेतील तीनशेहून अधिक विद्यार्थ्यांना बक्षीस दिले जात आहे.

solapur
बक्षीस वितरण करताना

सोलापूर- विद्यार्थ्यांना शालेय जीवनात प्रोत्साहन मिळावे, यासाठी सोलापुरातील श्री दिगंबर जैन गुरुकुल शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आहे. शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी जवळपास अडीच लाख रुपये निधी संकलन करून त्यातून दरवर्षी तीनशे विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.

माजी विद्यार्थ्यांच्या निधीतून दरवर्षी तीनशे विद्यार्थ्यांना बक्षीस

शनिवारी सोलापुरातील बाळीवेस येतील श्री दिगंबर जैन गुरुकुल शाळेतील विद्यार्थ्यांना बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी ईटीव्ही भारतचे पत्रकार सचिन गायकवाड यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस वितरीत करण्यात आले. विद्यार्थ्यांवर शालेय जीवनात होणारे संस्कार त्यांच्या भविष्याच्या प्रगतीसाठी हिताचे ठरतात, असे मत गायकवाड यांनी यावेळी व्यक्त केले.

शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी वेगवेगळ्या पातळीवर बक्षीस वितरण करण्यासाठी निधीचे संकलन केले. पाहता-पाहता तब्बल अडीच लाख रुपयांचा निधी जमा झाला. शाळेचे विद्यार्थी असलेले मुख्याध्यापक आशुतोष शहा यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे शाळेतील तब्बल 300 विद्यार्थ्यांना आता दरवर्षी बक्षीस मिळणार आहेत.

शाळेमध्ये पहिली ते बारावीपर्यंत अडीच हजारांहून जास्त विद्यार्थी शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या जातात. यामध्ये क्रीडाप्रकाराबरोबरच रंगभरण स्पर्धा, निबंध स्पर्धा, शुद्धलेखन स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, स्मरणशक्ती या सह वेगवेगळ्या प्रकारच्या 50 पेक्षा अधिक स्पर्धेचे आयोजन शाळेमध्ये केले जाते. या स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या स्पर्धकांना बक्षीस स्वरूपात वस्तू देण्यासाठी शाळेकडे निधी नव्हता. त्यामुळे शाळेचे मुख्याध्यापक आशुतोष शहा यांनी संकल्पना मांडून माजी विद्यार्थ्यांकडून निधीचे संकलन केले. यातून जवळपास अडीच लाख रुपये निधी जमा झाला. हे पैसे बँकेत मुदत ठेवत त्याच्या व्याजातून आलेल्या पैशाची वस्तू खरेदी करून दरवर्षी शाळेतील 300 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप केली जाणार आहेत.

शनिवारी (दि. 8 फेब्रुवारी) पार पडलेल्या या बक्षीस वितरण कार्यक्रमात विद्यार्थ्यांची संख्या इतकी मोठी होती की शाळेला बक्षीस वितरणाचा कार्यक्रम दोन दिवस ठेवावा लागला. संस्थेच्या वतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला माजी विद्यार्थ्यांनी देखील हातभार लावल्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांचा हुरूप वाढला आहे. शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना बक्षीस रूपात काही वस्तू मिळाल्याने विद्यार्थ्यांचा शाळेतील अभ्यासासह इतर स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी उत्साह वाढला आहे.

हेही वाचा - सोलापुरात शहराध्यक्षपदावरून 'एमआयएम'मध्ये बंडाळी

Last Updated : Feb 10, 2020, 11:45 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details