पंढरपूर(सोलापूर) -कोरोना रुग्णांवर उपचार करताना खासगी रुग्णालयांनी शासनाने निश्चित केलेल्या दरानुसारच आकारणी करावी. शासन निर्णयानुसार दर आकारण्यात आले आहेत का? याबाबत तपासणी करावी. कोरोनाबाधित तसेच इतर आजारांबाबत सर्व रुग्णांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. आयसीएमआरच्या सुचनेनुसार कोरोनाबाधित रुग्णांची माहिती तत्काळ एन. एच. पी पोर्टलवर भरावी, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या. कोरोना प्रतिबंधासाठी उपाययोजनेबाबत शासकीय विश्रामगृह येथे बैठक घेण्यात आली.
बैठकीला आमदार भारत भालके, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, शासकिय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, प्रांताधिकारी सचिन ढोले, उपविभागीय पोलीस अधिकारी सागर कवडे, तहसिलदार वैशाली वाघमारे, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले, वैद्यकीय अधीक्षिका डॉ. जयश्री ढवळे, डॉ. पुष्पा अग्रवाल, आयएमएचे डॉ. पंकज गायकवाड, डॉ. देशमुख, आदी. उपस्थित होते.