लातूर - वंचित बहुजन आघाडीवर माजी गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी पहिल्याच प्रचार सभेत टीका केली होती. या टीकेवर प्रतिक्रिया न देता सामना रंगणार आणि त्यातूनच त्यांना उत्तर मिळेल असे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी लातुरात प्रसारमाध्यमांना सांगितले. तसेच अद्यापही अनेक पर्याय समोर असल्याचे ते म्हणाले.
प्रसार माध्यमांशी बोलताना अॅड. प्रकाश आंबेडकर लातूर येथील राम गारकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली. उमेदवार राम गारकर यांना अर्ज दाखल करण्यापूर्वी सूचनाही केल्या. लोकसभा निवडणुकित प्रचार यंत्रणा राबविण्यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे.
रविवारी रात्री सोलापूर येथे होणाऱ्या बैठकीत उर्वरित ४ जागांवरील उमेदवार निश्चित होणार असून उद्या सकाळी यादी समोर येईल. त्यामुळे माझ्यासमोर सोलापूर, अकोला, नागपूर, मुंबई हे सर्व पर्याय खुले असल्याचे ते म्हणाले.
भाजपाची 'बी' टीम म्हणून आमच्यावर होत असलेली टीका ही फायदेशीर आहे. जेवढी अधिक टीका आमच्यावर कराल तेवढा मतदानाचा टक्का वाढणार आहे. सर्व महाराष्ट्रात ५० टक्के मतदारांचा कौल वंचित बहुजन आघाडीकडे आहे. माढा येथे हीच बाब शरद पवार यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी माघार घेतली असल्याचे सांगताना त्यांनी अजित पवार यांच्या टीकेला उत्तर दिले. उद्यापर्यंत उर्वरित चारही जागेवरील उमेदवार निश्चित केले जाणार आहेत. तर संबंध महाराष्ट्रात आमची काँग्रेसशी नाही तर भाजपशी लढत असल्याचे सांगितले.