पंढरपूर (सोलापूर) -कोरोना, लॉकडाऊन, वारंवार पडणारा पाऊस, शेतमालाची नासाडी आणि पडलेले दर यामुळे वैतागलेल्या शेतकऱ्यांपुढे आता उभ्या पिकांची चोरी हे नवे संकट येवून ठेपले आहे. असाच एक प्रकार सांगोला तालुक्यातील महूद येथे घडला असून डाळिंब चोरी करणाऱ्या चोराला शेतकऱ्यांनी स्वतः पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
डाळिंबाची चोरी करणाऱ्या चोरट्याला शेतकऱ्यानेच रंगेहात पकडले - पंढरपूर गुन्हे वार्ता
कोरोना महामारी व निसर्गाचा लहरीपणा यामुळे सातत्याने अडचणीत सापडणाऱ्या शेतकऱ्यांपुढे आपले उभे पीक चोरी होण्याचे नवीन संकट उभे राहिले आहे. असाच एक प्रकार सांगोला तालुक्यातील महूद येथे घडला असून डाळिंब चोरी करणाऱ्या चोराला शेतकऱ्यांनी स्वतः पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.
महूद येथील स्वप्नील दशरथ मेटकरी यांची उपजीविका शेतीवर चालते. मेटकरीवस्ती येथे असलेल्या पाच एकर क्षेत्रात त्यांची डाळिंबाची बाग आहे. ही बाग सहा महिन्यापूर्वी धरलेली असून त्यावरील फळ काढणीस आले आहे. बाग पाहण्यासाठी व्यापारी येऊन जात आहेत; मात्र झाडावरील डाळिंब कमी होत असल्याचा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यामुळे रात्रीच्या वेळी त्यांनी बागेत चक्कर मारायला सुरूवात केली. तेव्हा शेता शेजारील विठ्ठलवाडीत राहणारा रणजीत नानासाहेब कांबळे याने बागेतील डाळिंब तोडून पोत्यात भरल्याचे दिसून आले. सुमारे सहा हजार रुपये किमतीची शंभर किलो वजनाची भगवा जातीची डाळिंबे चोरून नेताना त्यास रंगेहात पकडले. त्यानंतर पोलिस पाटील प्रभाकर कांबळे व फिर्यादी स्वप्नील दशरथ मेटकरी यांनी स्वतः रणजीत कांबळे याला सांगोला पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. कोरोना महामारी व निसर्गाचा लहरीपणा यामुळे सातत्याने अडचणीत सापडणाऱ्या शेतकऱ्यांपुढे आपले उभे पीक चोरी होण्याचे नवीन संकट उभारले आहे. शेतातील उभ्या पिकांची चोरी, विद्युत पंप, वायर, यांत्रिक अवजारे यासह शेतामधील जनावरांची चोरी यामुळे परिसरातील शेतकरी पुरता हैराण झाला आहे. विठ्ठलवाडी परिसरातील तसेच गावाच्या अनेक भागातून अशाप्रकारे शेतीमालाच्या व साहित्याच्या चोऱ्या झालेल्या आहेत; परंतु पोलिसांना अद्यापही आरोपीच सापडून येत नव्हते. आता अनेक घटनांचा शोध लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.