सोलापूर- अक्कलकोट तालुक्यात ऑक्टोबर महिन्यात सहा दरोडेखोरांनी ग्रामस्थांना मारहाण करून दरोडा टाकला होता. अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात याबाबत नोंद झाली होती. याबाबत शांताबाई दत्तात्रय कोळेकर (वय 60 वर्षे,रा. शिरवळ, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) यांनी तक्रार दिली होती. सविता माने यांनाही मारहाण करून त्यांच्या घरातील रोख रक्कम, दागिने लंपास केले होते. सोलापूर पोलिसांनी ( Solapur Rural Police ) व परभणी पोलिसांनी ( Parbhani Police ) या दरोड्याचा तपास लावून एका दरोडेखोरास अटक केली आहे. सनीदेवल सुरेश काळे (वय 25 वर्षे, रा.पानमंगरूळ, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर ) यास अटक केली आहे. पण, यासोबत असणारे सहा संशयीत दरोडेखोर अजूनही फरार आहेत.
परभणी पोलिसांनी केली अटक -सनीदेवल सुरेश काळे यावर आपल्या सहा सहकाऱ्यांसोबत अक्कलकोट येथील शिरवळ गावात 29 ऑक्टोबर, 2021 रोजी दरोडा टाकल्याचा आरोप होता. सोलापूर पोलीस त्याचा शोध घेत होते. याची माहिती मिळताच सनीदेवल काळे हा परभणीत लपून बसला होता. पण, सनीदेवल काळे यावर परभणी येथील पूर्णा पोलीस ठाणे, पालम पोलीस ठाणे दरोडा आणि खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. परभणी पोलिसांनी सनीदेवलचा तपास करून त्याला अटक केले होते.
सोलापूर पोलिसांकडे वर्ग करून दरोड्याची उकल -सनीदेवल काळे यास सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेने ( Local Crime Branch ) आपल्या ताब्यात घेऊन दरोड्याचा तपास केला. पोलीस कोठडीत त्याने माहिती दिली की, अक्कलकोट तालुक्यातील हंनुर, चपळगाव, पानमंगरूळ, तडवळ, मोहोळ तालुक्यातील सौंदणे या ठिकाणी दरोडे घातले आहेत. यानुसार सनीदेवलवर मंद्रुप पोलीस ठाणे, कामती पोलीस ठाणे, अक्कलकोट पोलीस ठाणे येथे घरफोडी आणि दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत.