पंढरपूर - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे राज्य सरकारने 'ब्रेक द कोरोना चेन' या उपक्रमांतर्गत सर्व धार्मिक स्थळे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर 30 एप्रिलपर्यंत बंद राहणार आहे. यामुळे पंढरपुरात भाविकांनाही बंदी असणार आहे. मात्र गेल्या पाच महिन्यापासून मंदिरावर अवलंबून असलेल्या व्यापाऱ्यांची उपासमार होणार आहे. राज्य सरकारने मंदिर बंद न करता कोरोनाचे नियम कडक करावे, अशी मागणी स्थानिक व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
'पहिल्या लॉकडाउनमुळे आर्थिक फटका'
श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेचे मंदिर 17 मार्च 2020साली कोरोना संक्रमणामुळे बंद करण्यात आले होते. त्यानंतर सुमारे आठ महिन्यानंतर दिवाळीच्या पाडव्याला विठ्ठलाचे द्वार भाविकांसाठी खुले केले होते. मात्र लॉकडॉऊनच्या आठ महिन्याच्या काळामध्ये आषाढी, कार्तिकी, माघ वारी जिल्हा प्रशासनाकडून रद्द करण्यात आली होती. त्यामुळे यावर पोट असणाऱ्या मंदिर परिसरातील व्यापाऱ्यांची प्रचंड आर्थिक नुकसान झाले होते.
'गेल्या पाच महिन्यांपासून आर्थिक घडी सुरळीत'
राज्य सरकारने दिवाळीच्या पाडव्यादिवशी मंदिर दर्शनासाठी खुले केले. कोरोना नियमांचे पालन करत मंदिर समितीकडून भाविकांना दर्शनाची सोय करून देण्यात आली होती. त्यानंतर पंढरपूर येथे भाविकही कुंकू, बुक्का, हार, नारळ, पेढे, खेळणी, प्रासादिक व वस्तू हे खरेदी करत होते. त्यामुळे पंढरीतील व्यापाऱ्यांचे जे आर्थिक चक्र गेल्या आठ महिन्यात थांबले होते, ते दिवाळीच्या पाडव्यापासून सुरळीत चालू झाले होते. मात्र 5 एप्रिलपासून मंदिर बंद होत असल्यामुळे व्यापाऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे.
'नियमावली तयार करून मंदिर सुरू राहावे'
पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मंदिर भाविकांसाठी खुले राहावे. कोरोना संक्रमण रोखण्यासाठी मंदिर प्रशासनाने भाविकांना दर्शन देताना कोरोनाची सर्व नियम पाळत दर्शन सुरू ठेवावे. मात्र विठ्ठल-रुक्मिणी मंदिर बंद झाल्यामुळे मंदिर परिसरातील व्यापाऱ्यांची उपासमार होणार आहे. येथील किरकोळ व छोट्या व्यापाऱ्यांवर आर्थिक संकट निर्माण होईल. त्यामुळे पांडुरंगाचे मंदिर बंद ठेवू नये, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.