पंढरपूर (सोलापूर)-आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झालेल्या मराठा समाजाच्या वतीने शनिवारी पंढरपूर ते मंत्रालय असा आक्रोश मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र, प्रशासनाने पंढरपुरात संचारबंदी लागू करत परवानगी नाकारली आहे. पंढरपुरात मराठा आंदोलकांना मोर्चा काढण्यासाठी आणि जर आरक्षणाबाबत सरकार ठोस भूमिका स्पष्ट करणार असेल तर आंदोलन माघार घेण्यासंदर्भात शुक्रवारी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्यासोबत बैठक झाली होती. मात्र, ती बैठक निष्फळ ठरली आहे. त्यानंतरही मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी आक्रोश मोर्चा काढण्याच्या निर्णय ठाम असून पंढरपुरातून मोर्चा निघणार असल्याची भूमिका स्पष्ट केली आहे.
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पंढरपूर ते मंत्रालय असा आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. मात्र, उद्याच्या नियोजित मोर्चापूर्वीच पोलीस प्रशासनाने पंढरपुरात संचारबंदी लागू केली. यावरून मराठा समजातातून प्रशासनाकडून संताप व्यक्त करण्यात आला. तसेच मोर्च्याची सहभागी होण्याकरीता 50 जणांना पंढरपुरात एकत्र येण्याची परवानगी मागितली होती. मात्र पोलीस प्रशासनाप्रमाणे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी देखील परवानगी नाकरल्याने आज झालेली मराठा समन्वयक आणि जिल्हाधिकारी यांची बैठक निष्फळ झाली. त्यानंतर मराठा समाज आंदोलनावर ठाम राहिला आहे.
पंढरपुरातून उद्या आक्रोश मोर्चा निघणारच-
मराठा क्रांती मोर्चा मोर्चाची सुरुवात पंढरपूर येथील नामदेव पायरीला नतमस्तक करून होणार आहे. त्यानंतर पंढरपुरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून हा मोर्चा मुंबईच्या दिशेने आगेकूच करणार आहे. मात्र, यावेळी पोलीस प्रशासनाने बळाचा वापर न करता हे आंदोलन शांततेत करू द्यावी, अशी मागणी मराठा राज्य समन्वयक महेश डोंगरे, धनाजी साखळकर यांनी केली. यावेळी जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या नोटीस फाडून राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाचा मराठा क्रांती मोर्चा कडून निषेधही व्यक्त करण्यात आला.