पंढरपूर (सोलापूर)- मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पंढरपूर ते मंत्रालय या आक्रोश मोर्चाला आज पंढरपुरातून सुरुवात झाली. प्रशासनाने पंढरपुरात संचारबंदी लागू केली असतानाही तो आदेश झुगारून आज नामदेव पायरीवर नतमस्तक होत मोजक्याच मराठा कार्यकर्त्यांनी मोर्चाला सुरुवात केली. यावेळी राज्य सरकारला मराठा आरक्षण देण्याची आणि अन्य मागण्या मान्य करण्याची सरकारला 'सद्बुद्धी दे' असे साकडे विठ्ठला चरणी घालण्यात आले.
सकल मराठा समाजाच्या वतीने काढण्यात आलेला हा मोर्चा विठ्ठल मंदिरापुढील नामदेव पायरीपासून पंढरपूर शहर पोलीस ठाण्यापर्यंत पायीच मार्गस्थ झाला. त्यानंतर दहा गाड्यांमध्ये मराठा बांधव बसून मुंबईकडे रवाना झाले आहेत. त्याठिकाणी मुख्य सचिवांसह मराठा बांधवाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होणार असल्याचे पदाधिकाऱ्याने सांगितले.
राज्य सरकारला आरक्षण देण्याची सद्बुद्धी दे नामदेव पायरीचे दर्शन घेऊन सुरुवात-
सध्या कोरोनाच्या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव अद्याप संपलेला नाही, यामुळे पंढरपुरात गर्दी होऊ नये. नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये. यासाठी मराठा समाजाच्या मोर्चामुळे शहरात गर्दी होऊ नये, अशा सूचना पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या होत्या. तसेच अधिकची सुरक्षा म्हणून पोलीस प्रशासनाने मोठा पोलीस बंदोबस्त लावला होता. सकाळी नऊ वाजल्यापासून मराठा समाजाचे पदाधिकाऱ्यांनी शिवाजी चौकात जमण्यास सुरुवात झाली होती. त्यानंतर नामदेव पायरीचे दर्शन घेऊन आंदोलक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ येऊन दाखल झाले.
पायी दिंडीवरून तणाव-
छत्रपती शिवाजी चौक ते पंढरपूर पोलीस स्टेशन इथपर्यंत मराठा क्रांती मोर्च्याच्या पायी दिंडीला प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली. मात्र ही पायी दिंडी पोलीस स्टेशनपर्यंत आल्यानंतर पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांना थांबवण्यात आले. तसेच ही पायी दिंडी स्थगित करण्याचीही विनंती केली. मात्र काही काळापुरते आंदोलनकते आणि पोलीस मध्ये पायी दिंडीच्या परवानगीवरून तणाव निर्माण झाला होता. त्यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकारी व समन्वयकांनी जागेवरच ठिय्या आंदोलन केले.
काही काळानंतर पोलीस आणि आंदोलनकर्ते यांच्या संवादातून समंजसपणाची भूमिका घेत पंढरपूर ते मंत्रालय असा आक्रोश मोर्चा काढण्यासाठी पायी दिंडी ऐवजी वाहनातून मंत्रालयापर्यंत प्रवास करण्याची परवानगी पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली, त्यानंतर मराठा मोर्चातील मोजके कार्यकर्ते वाहनातून पोलीस बंदोबस्तात मुंबईच्या दिशेने रवाना झाले. यामुळे मराठा आरक्षण प्रश्न आता मराठा क्रांती मोर्चातील समन्वयक मंत्रालयातील मुख्य सचिवांसमोर आपल्या मागण्या मांडणार आहे. या वाहनांसह पोलीस प्रशासनाने पोलीस बंदोबस्तही रवाना केला आहे.