सोलापूर- ज्या पद्धतीने पंढरपूरचा मराठवाडा आणि सोलापूर जिल्ह्याशी संपर्क सुटलेला आहे, त्याच पद्धतीने पंढरपूरचा मंगळवेढामार्गे कर्नाटकाकडे जाण्याचा संपर्कही तुटलेला आहे. यामुळे कर्नाटकातून विठ्ठल दर्शनासाठी आलेले भाविक सध्या पंढरपुरातच अडकून पडले आहेत. उजनी आणि वीर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यापुणे भीमा नदीला महापूर आला आहे. या पुरामुळे पंढरपुरात येणारे सर्वच मार्ग पाण्याखाली गेले आहेत.
भीमेच्या पुराने पंढरपूरचा संपर्क तुटला; कर्नाटकचे भाविकही अडकले - गोपाळपूर
पंढरपुरात निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे पंढरपूरचा मंगळवेढामार्गे कर्नाटकाकडे जाण्याचा संपर्कही तुटलेला आहे.
आज सकाळच्या सुमारास नदी पात्रातून काही प्रमाणात होडीतून येजा सुरू होती. पात्र पाण्याचा विसर्ग वाढल्याने तिही वाहतूक बंद करण्यात आली आहे. चंद्रभागा नदीवरील जूना दगडी पूलासह नवीन रस्ते वाहतूक व रेल्वे पूल ही पुराच्या पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे पंढरपूरातून सोलापूर, बार्शी, सातारा, सांगली, मंगळवेढा मार्गे कर्नाटक कडे जाणारी वाहतूक पूर्ण बंद झाली आहे.
दरम्यान, चंद्रभागा नदीला आलेल्या पुरामुळे विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी आलेले भाविकही पंढरपुरातच अडकून पडले आहेत. यामध्ये कर्नाटकच्या भाविकांचाही समावेश आहे. नदी पात्रातील पाण्यात अद्याप वाढ होत असून खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासासने पंढरपूरातील नदी काठच्या भाविकांना ६५ एकर पालखी तळ परिसरात हलविण्यात आले आहे.