सोलापूर - पंढरपूर शहरातील भुरटी आणि सराईत गुन्हेगारांची पंढरपूर पोलिसांनी चांगलीच दखल घेतली आहे. शहरातील १ हजार ५०० गुन्हेगारांना हद्दपार करण्याच्या रडारवर आहेत. या गुन्हेगारांना गुन्हा कराल तर खैर नाही, आपली हद्दपारी नक्की आहे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. यामुळे पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवला असल्यामुळे शहरातील गुन्हेगारांनी याची धास्ती घेतली आहे.
पंढरीतील गुन्हेगारांची पोलिसांकडून 'नाकाबंदी' हेही वाचा -भावाला लागली सैन्यात नोकरी, सैनिक भावाने 90 किलोमीटर धावत फेडला नवस
गेल्या काही महिन्यांमध्ये येथील गुन्हेगारांची नाकाबंदी केली असून सुमारे १ हजार ५०० गुन्हेगारांना हद्दपारीच्या कारवाईच्या टोकावर आणून बसवले आहे. त्यामुळे शहरातील गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. सद्यस्थितीत ५५ गुन्हेगार हद्दपार असून, मोक्काअंतर्गत केलेल्या कारवाईत ५० गुन्हेगारांपैकी ४० जण गजाआड आहेत. या कारवायांमुळे पंढरीतील गुन्हेगार चांगलेच हादरले आहेत. दरम्यान, शहर पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी कौतुक केले आहे.
पंढरपूर शहरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे ही अध्यात्मिक नगरी कायमच चर्चेचा विषय बनली. येथील गुन्हेगारीची चर्चा सबंध राज्यात झाली. परंतु येथील गुन्हेगारीने गुन्ह्यांची सीमारेषा ओलांडली आणि येथील गुन्हेगारांचे फास आवळण्यास सुरुवात झाली. गेल्या दोन वर्षाच्या काळात शहरातील गुन्हेगारांवर कायद्याचा धाक दिसू लागला. गुन्हे नोंदवण्यासाठी होणारी टाळाटाळ थांबली. टू प्लस कायद्यामुळे गुन्हेगार सहजच कारवाईच्या रडारवर आले आहेत.
गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या पंढरपूर शहरातील गुन्हेगारांवर कारवाईचे फास आवळले आहेत. सद्यस्थितीत दोनपेक्षा जास्त गुन्हे असलेल्या गुन्हेगारांचे रेकॉर्ड बनवण्यात आले आहेत. हे गुन्हेगार सध्या हद्दपारीच्या कारवाईच्या टोकावर आहेत. याबाबत त्यांना समजही देण्यात आला आहे. ५५ गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. तर, ५० गुन्हेगारांवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. यातील 40 गुन्हेगारांना गजाआड केले आहे. पंढरपूर पोलिसांच्या या कारवाईमुळे पंढरपूरमधील गुन्हेगारी जगतामध्ये कायद्याचा धाक निर्माण झाला आहे. या पोलिसी कारवाईमुळे येथील गुन्हेगारांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.