सोलापूर - करमाळा तालुक्यातील पोंधवडी गावातील दलित वस्तीमध्ये पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनची कामे अपूर्ण असूनही बिल अदा करण्यात आले आहे. पाणी पुरवठा योजनेचे बिल अदा करूनदेखील दलित वस्तीमध्ये पाण्याचा थेंबही पोहचला नाही. पाण्यासाठी नागरिकांना वणवण फिरावे लागत आहे.
जिल्हा परिषदेच्या वतीने राबवण्यात आलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे, या योजनेअंतर्गत पोंधवडी गावासाठी सहा लाख रुपयांची पाणी पुरवठा योजना राबवण्यात आली. मात्र त्या ठिकाणी थोडेच काम करुन मोटारही न बसवता पूर्ण कामाचे बिल काढण्यात आले. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाईची मागणी पोंधवडी गावातील युवकांनी केली आहे.
पोंधवडी ग्रामपंचायत येथे पाणीपुरवठा व पेविंग ब्लॉकचे काम मंजूर करण्यात आले होते. या कामात पाईपलाईन, मोटर व विद्युत प्रवाह बसवणे अपेक्षित असताना फक्त काही ठिकाणी पाईप लाईनची कामे पूर्ण झाली आहेत. पुढील कामे न करताच संपूर्ण बिल उचलल्याची बाब पोंधवडी ग्रामस्थांनी पंचायत समितीचे उपविभागीय अभियंता यांच्या निदर्शनास आणून दिली होती. तसेच कामाचे बिल काढू नये, यासाठी ९ एप्रिल रोजी पत्र देण्यात आले होते.