महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाराष्ट्र विधानसभा 2019 : सोलापूर जिल्ह्यात युतीची मुसंडी की आघाडी मारणार बाजी

विधानसभा निवडणुकीसाठी 21 ऑक्टोबरला मतदान पार पडले. येथील काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी पक्षाला रामराम करत भाजप, सेना पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे यंदाच्या सोलापुरातील बहुतांश विधानसभा मतदारसंघामध्ये युतीचे पारडे जड असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

संपादित छायाचित्र

By

Published : Oct 23, 2019, 3:59 PM IST

सोलापूर- विधानसभा निवडणुकीसाठी 21 ऑक्टोबरला मतदान पार पडले. येथील काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी पक्षाला रामराम करत भाजप, सेना पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे यंदाच्या सोलापुरातील बहुतांश विधानसभा मतदारसंघामध्ये युतीचे पारडे जड असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात एकूण 11 विधानसभा मतदारसंघ असून, 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे 4, काँग्रेस- 3, भाजप- 2, शिवसेना- 1, तर शेकापकडे 1 जागा होती.


तर लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या सोलापूर मतदारसंघाला 2014 पासूनच भाजपने सुरूंग लावला. येथे भाजपने दुसऱ्यांदा कमळ फुलवण्यात यश मिळवले आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीचा गड समजला जाणारा माढा मतदारसंघातील आणि अकलूज येथील राष्ट्रवादीचे समर्थक मोहिते-पाटील घराण्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने माढ्याच्या जागेवरही भाजपने ताबा मिळवला. या ठिकाणी फलटनचे रणजितसिंह निंबाळकर खासदार आहेत.

मतदार संघ निहाय 2014 ची स्थिती

सोलापूर मध्यविधानसभा मतदारसंघ

या मतदारसंघात अनेक वर्षांपासून काँग्रेसचे प्राबल्य आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे या मतदारसंघाचे 2009 पासून प्रतिनिधीत्व करीत आहे. 2014 साली पक्षातल्याच दोन मोठ्या नाराज नेत्यांनी शिंदेंच्या विरोधात निवडणूक लढविली होती. त्यावेळी एमआयएमकडून तौफिक शेख यांनी निवडणूक लढवत 37 हजार 138 मते घेतली होती. महेश कोठे यांनी 33 हजार 334 मते घेतली होती. तर प्रणिती शिंदे यांनी 46 हजार 907 मते घेत निवडणूक जिंकली होती. त्यावेळी काँग्रेसच्या या दोन बंडखोरांनी चांगलीच खिंड लढविली होती.
यावेळी या मतदारसंघामध्ये महेश कोठे यांनी सेनेशी बंडखोरी करत मैदानात अपक्ष लढत दिली. तर एमआयएमचे तौफिक शेख हे खूनाच्या गुन्ह्यात तुरुंगात असल्याने फारूक शाब्दी यांना रिंगणात उतरले आहेत. तर काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश करून दिलीप माने यांनी प्रणिती शिंदेना आव्हान दिले आहे.


2014 च्या विधानसभेत मिळालेली मतं
⦁ प्रणिती शिंदे (काँग्रेस) - 46 हजार 907
⦁ तौफिक शेख (एमआयएम) - 37 हजार 138
⦁ महेश कोठे (शिवसेना) - 33 हजार 334
⦁ मोहिनी पत्की (भाजप) - 23 हजार 319

सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ

दक्षिण सोलापूर मतदारसंघात पूर्वी काँग्रेसचेच आमदार होते. परंतु, 2014 च्या मोदी लाटेत या जागेवर भाजपने ताबा मिळवला. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी काँग्रेसचे आमदार दिलीप माने यांचा पराभव केला होता.
यावेळी, दिलीप माने यांनी शिवसेनेच्या तिकीटावर सोलापूर मध्यमधून काँग्रेसच्या विरोधात शड्डू ठोकून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. यंदा काँग्रेसने मौलाली शेख या मुस्लीम उमेदवाराला रिंगणात उतरवले आहे.

2014 च्या विधानसभेत मिळालेली मतं
⦁ सुभाष देशमुख (भाजप) - 70 हजार 077
⦁ दिलीप माने (काँग्रेस) - 42 हजार 954
⦁ गणेश वानकर (शिवसेना) - 14 हजार 188
⦁ बाळासाहेब शेळके (राष्ट्रवादी काँग्रेस) - 12 हजार 363

सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ

उत्तर सोलापूर मतदारसंघ हा सुरुवातीपासूनच भाजपचा बालेकिल्ला आहे. 2014 च्या निवडणुकीतही भाजपने आपला राखत या मतदारसंघातून मोठा विजय मिळविला होता.
यंदाही पालकमंत्री विजयकुमार देशमुख हे सोलापूर उत्तरमधून निवडणूक लढवित आहेत. पण, यावेळी त्यांना वंचित बहुजन आघाडीकडून आनंद चंदनशिवे हे चांगली टक्कर देत आहेत.

2014 च्या विधानसभेत मिळालेली मतं
⦁ विजय देशमुख (भाजप) - 86 हजार 877
⦁ महेश गादेकर (राष्ट्रवादी काँग्रेस) - 17 हजार 999
⦁ विश्वनाथ चाकोते (काँग्रेस) - 14 हजार 456
⦁ विष्णुपंत गावडे (एमआयएम) - 12 हजार 358

करमाळा विधानसभा मतदारसंघ

करमाळा मतदारसंघ पूर्वी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. परंतु 2014 मध्ये येथील संजय शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या रश्मी बागल यांच्या विरोधात निवडणुकीत उडी घेतली. यामुळे या मतदारसंघामध्ये मतांचे मोठे विभाजन झाले. याचा फायदा शिवसेनेला झाल्याने नारायण पाटील केवळ 257 मतांनी विजयी झाले होते. मात्र, यावेळी रश्मी बागल यांनी सेनेत प्रवेश केल्याने नारायण पाटलांचा पत्ता कट झाला. तसेच राष्ट्रवादीला चांगला उमेदवार न मिळाल्याने अपक्ष संजय शिंदे यांना राष्ट्रवादीने पुरस्कृत केले आहे. तसेच पत्ता कट झाल्याने नाराज असलेले नारायण पाटील यांनीही अपक्ष उमेदवारी भरली. त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे अतुल खूपसे यांनीही चांगले आवाहन उभे केले आहे.

2014 च्या विधानसभेत मिळालेली मतं
⦁ नारायण पाटील (शिवसेना)- 60 हजार 674
⦁ रश्मी बागल (राष्ट्रवादी काँग्रेस) - 60 हजार 417
⦁ संजय शिंदे (स्वाभिमानी शेतकरी संघटना)- 58 हजार 377
⦁ जयवंतराव जगताप (काँग्रेस) - 14 हजार 348

बार्शी विधानसभा मतदारसंघ

बार्शी मतदारसंघामध्ये 1985 पासून 2004 वगळता आत्तापर्यंत अॅड. दिलीप सोपल यांचे वर्चस्व आहे. सोपल हे काँग्रेस, अपक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस अशा सर्व पक्षांची सफर केली. यंदा ते सेनेकडून रिंगणात आहेत. 2004 साली येथील राजेंद्र राऊत यांनी सेनेच्या तिकिटीवर विजय मिळवला होता. यंदा सेनेने पत्ता कट केल्याने राऊत चांगलेच नाराज आहेत. त्यामुळे त्यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निरंजन भूमकर यांना तिकीट देत मैदानात उतरवले आहे. परंतु ऐन निवडणुकीच्या तोंडावर राजेंद्र राऊत यांनी अपशब्द वापरला होता. त्यानंतर त्यांनी दिलगीरीही व्यक्त केली होती. राऊतांविरोधात सोपल गटाकडून मोठी आंदोलने करण्यात आली. यामुळे याचा फटका राऊत होणार असून दिलीप सोपल निवडून येण्याची शक्यता आहे.

2014 च्या विधानसभेत मिळालेली मतं
⦁ दिलीप सोपल (राष्ट्रवादी काँग्रेस) - 97 हजार 655
⦁ राजेद्र राऊत (शिवसेना) - 92 हजार 544
⦁ राजेंद्र मिरगणे (भाजप) - 16 हजार 506
⦁ गणेश शिंदे (बसपा) - 1 हजार 752


मोहोळ विधानसभा मतदारसंघ

हा मतदारसंघ राखीव आहे. मोहोळमध्ये राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादीचे राजन पाटील यांनी मोठे वर्चस्व आहे. यामुळे याठिकाणी उमेदवार कोणीही असो सत्ता मात्र राष्ट्रवादीचीच असे समिकरण पाहायला मिळते. 2014 च्या निवडणुकीत अण्णाभाऊ साठे आर्थिक विकासमंडळाचे अध्यक्ष रमेश कदम हे राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आले. निवडून येताच मागेल त्याला पाणी, सौरदिवे, गाव तिथे रस्ता अशा विविध योजनांतून विकासकामांचा धडाका सुरू केला. पण, अण्णाभाऊ साठे आर्थिक विकासमंडळाचे अध्यक्ष असताना रमेश कदम यांनी तब्बल 385 कोटींचा घोटाळा केल्याची बाबा उघड झाली. या प्रकरणी त्यांनी अटक झाली. सध्या ते तुरुंगातच आहेत. तरीही त्यांनी तरुंगातून मोहोळसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. यंदा राष्ट्रवादीकडून यशवंत माने हे मैदानत आहेत. तर युतीकडून सेनेने नागनाथ क्षीरसागर यांना निवडणुकीच्या आख्याड्यात उतरवले आहे. पण, सेनेशी बंडखोरी करत मनोज शेजवाल हे अपक्ष निवडणूक लढवत असल्याने याचा किती फटका युतीला होईल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

2014 च्या विधानसभेत मिळालेली मतं
⦁ रमेश कदम (राष्ट्रवादी काँग्रेस) - 62 हजार 120
⦁ संजय क्षीरसागर (भाजप) - 53 हजार 753
⦁ मनोज शेजवळ (शिवसेना) - 42 हजार 478
⦁ लक्ष्मण ढोबळे (अपक्ष) - 12 हजार 014

अक्कलकोट विधानसभा मतदारसंघ

अक्कलकोट विधानसभा मतदारसंघ 1995 आणि 2009 चा अपवाद वगळता याठिकाणी काँग्रेसचेच निर्विवाद वर्चस्व आहे. तालुक्यातील बहुतांश गावात सिद्धराम म्हेत्रे कुटुंबियांचे वर्चस्व आहे. यंदा भाजपने सचिन कल्याणशेट्टी यांनी तिकीट दिले आहे. त्यांच्या प्रचारार्थ भाजपच्या मोठ्या नेत्यांनीही अक्कलकोटमध्ये हजेरी लावली होती.


2014 च्या विधानसभेत मिळालेली मतं
⦁ सिद्धाराम म्हेत्रे (काँग्रेस) - 97 हजार 333
⦁ सिद्रामप्पा पाटील (भाजप) - 79 हजार 689
⦁ शाब्दी मकबूल (मनसे) - 22 हजार 651
⦁ चंद्रकांत इंगळे (बसपा) - 3 हजार 891

पंढरपूर विधानसभा मतदारसंघ

दक्षिण काशी अशी ओळख असलेल्या पंढपूर विधानसभा मतदारसंघात पंढरपूरसह मंगळवेढा तालुकाही आहे. भारत भालके यांनी 2014 साली काँग्रेसकडून निवडणूक लढवत 91 हजार 863 मते मिळविली. तर स्वाभिमानीकडून प्रशांत परिचारक यांनी 82 हजार 950 इतकी मते मिळविली. परंतु, भाजपने त्यांना विधानपरिषेवर घेत पंढपूरवर भाजपचा शिक्कामोर्तब केला. युतीत पंढरपूरची जागा भाजपला सुटल्याने तसेच काँग्रेसने शिवाजीराव काळूंगे यांना तिकीट दिल्याने नाराज भारत भालके यांनी भाजपमध्ये प्रवेशासाठी धडपड सुरू केली होती. पण, भाजपने भालकेंचे विरोधक परिचारक यांना तिकीट दिल्याने भालकेंनी राष्ट्रवादीत प्रवेश घेत राष्ट्रवादीकडून निवडणुकीच्या आखाड्यात शड्डू ठोकला. आघाडी धर्म पाळण्यासाठी सुशीलकुमार शिंदे यांनी काँग्रेसचा राष्ट्रवादीला पाठिंबा जाहीर केला आहे. पण, काळूंगे यांनी माघार घेतली नाही. तसेच मंगळवेढ्यातील समाधान आवताडे यांनी युतीशी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केली. आवताडे यांचे मंगळवेढा तालुक्यात मोठे वर्चस्व असल्याने याचा फटका आघाडी आणि युतीलाही बसणार आहे.


2014 च्या विधानसभेत मिळालेली मतं
⦁ भारत भालके (काँग्रेस) - 91 हजार 863
⦁ प्रशांत परिचारक (स्वाभिमानी)- 82 हजार 950
⦁ समाधान आवताडे (शिवसेना) - 40 हजार 910
⦁ चंद्रकांत बागल (राष्ट्रवादी काँग्रेस) - 3 हजार 075


सांगोला विधानसभा मतदारसंघ

सांगोला विधानसभा मतदारसंघ हा दुष्काळी तालुका म्हणून प्रचलित आहे. या ठिकाणी शेतकरी आणि शेतीचे पाणी यावरच राजकारण केंद्रीत आहेत. याठिकाणी शेकापचे गणपतराव देशमुख यांचे प्राबल्य आहे. ते 1972 साली काकासाहेब साळुंके यांनी त्यांचा पराभव केला होता. परंतु, अडीच वर्षाच्या काळातच त्यांच्या मृत्यू झाल्याने येथे पोटनिवडणूक लागली होती. त्यावेळी पुन्हा गणपतराव देशमुख विजयी झाले. त्यानंतर 1995 साली शहाजी पाटील यांनी शिवसेनेकडून जोर लावत त्यांना निवडणुकीत पाडले होते. त्यानंतर आजपर्यंत गणपतराव देशमुख हेच या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत. त्यांनी यावेळी त्यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख यांना शेकापकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. पण, शेकापचे नेते आणि गणपतराव देशमुख यांचे जवळचे भाऊसाहेब रूपनर यांना सुरुवातीस तिकीट जाहीर करून नंतर डावलल्याने त्यांनी सेनेत प्रवेश केला. त्यामुळे शेकापची मते विभागून सेनेला जाण्याची शक्यता आहे. तसेच राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष, माजी आमदार दिपक सांळुके यांनी राष्ट्रवादीकडून तिकीट घेत सेनेच्या शहाजी पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे शेकापला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

2014 च्या विधानसभेत मिळालेली मतं
⦁ गणपतराव देशमुख (शेतकरी कामगार पक्ष) - 94 हजार 374
⦁ शहाजीबापू पाटील (शिवसेना) - 69 हजार 150
⦁ श्रीकांत देशमुख (भाजप) - 14 हजार 074
⦁ संभाजी अलदार (अपक्ष) - 7 हजार 444


माळशिरस विधानसभा मतदारसंघ

हा मतदारसंघ राखीव मतदार संघ आहे. पूर्वाश्रमीचा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जाणारा या मतदारसंघावर मोहिते पाटील यांच्या रूपाने भाजपने आपला झेंडा रोवला आहे. राष्ट्रवादीतील काही अंतर्गत वादविवादामुळे मोहिते पाटील कुटुंबीयांनी ऐन लोकसभेच्या निवडणुकीत भाजपमध्ये प्रवेश केल्याने माढा लोकसभा मतदारसंघाची धूरा जिल्ह्याबाहेर गेली. माळशिरस विधानसभा मतदारसंघासह माढा लोकसभा मतदारसंघामध्ये मोहिते पाटील गटाचे मोठे वर्चस्व आहे. यंदा भाजपने राम सातपुते हा नवा चेहरा या मतदारसंघात दिला आहे. तर, राष्ट्रवादीने उत्तमराव जानकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.

2014 च्या विधानसभेत मिळालेली मतं
⦁ हनुमंत डोळस (राष्ट्रवादी काँग्रेस) - 77 हजार 179
⦁ अनंत खंडागळे (अपक्ष) - 70 हजार 934
⦁ लक्ष्मण सरवदे (शिवसेना) - 23 हजार 537
⦁ त्रिभुवन धाईंजे (अपक्ष) - 7 हजार 636

माढा विधानसभा मतदारसंघ

या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे चांगले वर्चस्व आहे. 1995 पासून बबनराव शिंदे हे या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत. साखर कारखाने, पतपेढ्यांमुळे त्यांचे या मतदारसंघात वर्चस्व टिकून आहे. त्याचबरोबर त्यांचे बंधू संजय शिंदे यांनी करमाळ्यासह माढ्यातही कार्यकर्त्यांची साखरपेरणी केली आहे. परंतु युतीचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

2014 च्या विधानसभेत मिळालेली मतं
⦁ बबनराव शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस) - 97 हजार 803
⦁ कल्याण काळे (काँग्रेस) - 62 हजार 025
⦁ शिवाजी सावंत (शिवसेना) - 40 हजार 616
⦁ गणपतराव साठे (अपक्ष) - 14 हजार 149

ABOUT THE AUTHOR

...view details