पंढरपूर (सोलापूर) -सावळ्या विठूरायाची आषाढी यात्रा गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी प्रातिनिधिक स्वरूपाची करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होऊ नये म्हणून प्रशासनाकडून आठ दिवसांसाठी संचारबंदी लागू केली आहे. या काळात केवळ एसटी बस सेवा पंढरपुरातून सुरू राहणार आहे. मात्र, इतर राज्यातील एसटी बसेसला पंढरपुरात प्रवेश दिला जाणार नसल्याची माहिती पंढरपूरचे आगार प्रमुख सुधीर सुतार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.
पंढरपुरातून एसटी बस सेवा सुरू
पंढरपूर शहर व ग्रामीण भागांमध्ये जिल्हा प्रशासनाकडून संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे कोणत्याही भाविकाला पंढरपुरात प्रवेश दिला जाणार नाही. मात्र, जिल्हा प्रशासनाकडून एसटी बससाठी काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. पंढरपुरातून स्थानिक लोकांना बाहेर गावी जाता यावे, म्हणून पंढरपूर आगारातून बस सेवा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. इतर राज्यातून पंढरपूरला येणाऱ्या एसटी बसेसला येण्याची परवानगी नसणार आहे. पंढरपूर येथील स्थानिक नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून हा निर्णय जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आल्याची माहिती सुधीर सुतार दिली आहे.