सोलापूर- टेंभुर्णी-अहमदनगर राज्यमार्गावर करमाळा तालुक्यातील कुंभेज फाट्या जवळचा अरुंद पूल आणि रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. अरुंद रस्त्याचा अंदाज न आल्याने कार पुलावरून थेट 70 फूट खोल कालव्यात कोसळली. या अपघातात एक जण जागीच ठार तर एक जखमी झाला आहे. यापूर्वी या पुलावरून जळगाव जिल्ह्यातील एक जीप रस्त्याचा अंदाज न आल्याने कालव्यात कोसळली होती. त्या अपघातामध्ये तीन जण ठार झाले होते.
स्वाती साईकुमार रेड्डी जक्का (वय 28 वर्षे) हीचा जागीच मृत्यू झाला तर तिचा पती साईकुमार सतीश रेड्डी जक्का (वय 29 वर्षे, दोघे रा. बंगळूर, हल्ली मुक्काम गोरेगाव वेस्ट, मुंबई) हे जखमी झाले. मंगळवारी (दि 3 डिसेंबर) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास शिर्डीहून बंगळूरकडे चारचाकीमधून रेड्डी पती-पत्नी दोघे जात होते. करमाळा तालुक्यातील कुंभेज फाट्याजवळ कारचालक साईकुमार याला रस्त्याचा अंदाज न आल्याने पुलावरून कार थेट 70 फूट खोल कालव्यात कोसळली. या दुर्घटनेत नवदांपत्यापैकी स्वाती जागीच ठार झाली. तर अपघातानंतर कार मधील एअरबॅग उघडल्याने पती साईकुमार बचावला आहे. या ठिकाणी धोकादायक सूचना फलक लावलेला नाही. उंच संरक्षक कठडेही नाहीत.