सोलापूर- माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक न लढवण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी करत सोलापुरातल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी उपोषण सुरू केले आहे. सात रस्ता येथील यशवंतराव चव्हाण पुतळ्याच्या पायथ्याशी बसून विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हे आंदोलन सुरू केले आहे.
सामान्य कार्यकर्त्यांच्या हितासाठी का होईना पवारांनी माढ्यातून ही निवडणूक लढवावी, अशी मागणी होत आहे. माढा लोकसभा मतदारसंघातल्या राष्ट्रवादीतील अंतर्गत कुरघोड्या रोखण्यासाठी खुद्द शरद पवार यांनी माढा लोकसभा लढण्याचे सूतोवाच केले होते. माढ्याच्या मेळाव्यात बोलताना तुम्ही सगळे आग्रह करताय तर मी नाही म्हणणार आहे का? असे वक्तव्य करत त्यांनी निवडणूक लढण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे सर्व गट-तट कामाला लागले असतानाच मावळ लोकसभा मतदारसंघात पार्थ पवारच्या उमेदवारीमुळे शरद पवार यांची कौटुंबिक आणि राजकीय कोंडी झाली.