सोलापूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात काल (शनिवार, 12 ऑगस्ट) पुण्यात एक बैठक झाली. या बैठकीचे स्वरूप अत्यंत गुप्त ठेवण्यात आले होते. त्यामुळे यावरून राज्यात विविध चर्चांना उधाण आले आहे. अजित पवार आणि शरद पवार यांच्यात काय बोलणे झाले? अजित पवारांनी शरद पवारांना भाजपासोबत येण्याची ऑफर दिली का? सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रिपद मिळणार का? अशा चर्चा राज्यात रंगल्या होत्या. मात्र, आता शरद पवारांनी स्वत: या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
आमचा पक्ष भाजपाबरोबर जाणार नाही : 'मी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सांगतो की, आमचा पक्ष भाजपाबरोबर जाणार नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राजकीय धोरणामध्ये हे बसत नाही', असे शरद पवार यांनी म्हटले आहे. 'जरी आमच्या काही सहकार्यांनी वेगळी भूमिका घेतली असली, तरी त्यांचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न आमचे हितचिंतक करत आहेत. ते त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत, असे शरद पवार म्हणाले. त्यामुळे तुर्तास तरी शरद पवार हे भाजपासोबत जाणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.
आमच्यातील बैठक गुप्त नव्हती : या सोबतच शरद पवारांनी शनिवारच्या भेटीबद्दलही स्पष्टीकरण दिले. 'या भेटीमध्ये गुप्त असे काहीही नव्हते. मी कुटुंबातील वडीलधारा व्यक्ती आहे. अजित पवारांना पुतण्या म्हणून भेटीला बोलावले होते. हा काही चर्चेचा विषय होऊ शकत नाही', असे शरद पवार म्हणाले. त्यामुळे आमच्यातील बैठक गुप्त नव्हती असे शरद पवारांनी स्पष्ट केले आहे.