सोलापूर -आगामी विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सोलापूरमधील ११ मतदारसंघासाठी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. अजित पवार यांच्या उपस्थितीत या मुलाखती पार पडल्या. मात्र, यावेळी राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल आणि बबनराव शिंदे यांनी पक्षाच्या मुलाखतीला दांडी मारली आहे. यामुळे हे दोन्ही आमदार पक्षाला सोडचिट्टी देतील, अशी चर्चा मतदारसंघात होत आहे.
राष्ट्रवादीकडून सोलापूरमध्ये इच्छुकांच्या मुलाखती; दिलीप सोपल, बबनराव शिंदे यांची दांडी बबनराव शिंदे भाजपाच्या वाटेवर ?
राष्ट्रवादीचे माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी आज राष्ट्रवादी इच्छुकांच्या मुलाखतीकडे पाठ फिरवली आहे. यामुळे आमदार बबनराव शिंदे हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात होत आहे.
दिलीप सोपल शिवसेनेच्या वाटेवर ?
राष्ट्रवादीचे बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनीही इच्छुकांच्या मुलाखतीकडे पाठ फिरवली होती. यामुळे शिंदेप्रमाणे सोपल हे सोपल शिवसेनेत जातील अशी चर्चा होत आहे.
अजित पवार यांचा बचावात्मक पवित्रा
आमदारांच्या अनुपस्थितीबाबत विचारल्यावर अजित पवार यांनी, देवदर्शन, आजारपण यामुळे दोन्ही आमदार मुलाखतीला आले नसल्याचा खुलासा केला. एकूणच मुलाखतीच्या निमित्ताने अजित पवार हे बचावात्मक पवित्र्यात असल्याचे पाहायला मिळाले. पुढे जात त्यांनी नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आता बेरजेच्या राजकारण करायला सुरुवात केल्याचे दिसत आहे.