महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

प्रदेश सचिव पद, सदस्यत्वासह पक्षाच्या कामावर निलंबनाचा परिणाम नाही - नरसय्या आडम

पक्षाने पुकारलेल्या संपात सहभागी न होता पंतप्रधान मोदींच्या या सभेला हजेरी लावणे आणि त्यांचे कौतुक करणे आडम यांना महागात पडले आहे. त्यांच्यावर केंद्रीय समितीतून कारवाई करण्यात आली आहे.

माजी आमदार नरसय्या आडम

By

Published : Mar 5, 2019, 10:26 AM IST

सोलापूर- पक्षादेश डावलून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमात हजेरी लावल्याने माजी आमदार नरसय्या आडम यांच्यावर पक्षांने निलंबनाची कारवाई केली आहे. विशेष म्हणजे नरसय्या आडम हे माकपचे प्रदेश सचिव असताना केंद्रीय समितीतून आडम यांना डावलत त्यांच्यावर निलंबनाची ही कारवाई झाली आहे. त्यामुळे कामगार विश्वात चर्चेला उधाण आले आहे.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने गेल्या ८ आणि ९ जानेवारीला बेरोजगारांना रोजगार आणि आदिवासींना जमीन यांसह इतर मागण्यांसाठी देशव्यापी संपाची हाक दिली होती. याच दरम्यान म्हणजे ९ जानेवारीला सोलापूरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होती. या सभेदरम्यान मोदींच्या हस्ते गरीब, कष्टकऱ्यांच्या गृहप्रकल्पातील ३० हजार घरांचा शुभारंभ आणि लोकार्पण करण्यात येणार होते. म्हणून या सभेला कॉम्रेड आडम मास्तर हजर राहिले. ते नुसते हजरंच राहिले नाहीत, तर त्यांनी भाषण करताना मुख्यमंत्री फडणवीस आणि पंतप्रधान मोदींवर स्तुतीसुमने उधळली. ती उधळताना आघाडी सरकारने थांबविलेली रे नगर गृहप्रकल्पाची फाईल भाजप सरकारने मंजूर केल्याबद्दल जाहीर स्तुती केली होती. त्यामुळे पक्षाने पुकारलेल्या संपात सहभागी न होता पंतप्रधान मोदींच्या या सभेला हजेरी लावणे आणि त्यांचे कौतुक करणे आडम यांना महागात पडले आहे. त्यांच्यावर केंद्रीय समितीतून कारवाई करण्यात आली आहे.

याबाबत आडम लवकरच विस्ताराने त्यांचे म्हणणे मांडणार आहेत. पण तूर्तास त्यांच्या प्रदेश सचिव पद, पक्ष सदस्यत्व आणि पक्षाच्या कामावर याचा कोणताच परिणाम होणार नाही, असा खुलासा नरसय्या आडम यांनी केला.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details