Sharad Pawar Ajit Pawar Secret Meeting : काका-पुतण्यांची गुप्त बैठक; शरद पवारांनी स्पष्टच सांगितले... - अजित पवार शरद पवार गुप्त भेट पुणे
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात शनिवारी पुण्यात गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर आली होती. त्यावर आज खुद्द शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शनिवारी झालेल्या काका-पुतण्याच्या गुप्त बैठकीनंतर राजकीय घ़डामोडींना वेग आला आहे. पुण्यातील एका बड्या उद्योगपतीच्या घरी ही गुप्त बैठक झाली असल्याची (Sharad Pawar Ajit Pawar Secret Meeting) माहिती समोर आली होती.
Etv Bharat
By
Published : Aug 13, 2023, 6:29 PM IST
|
Updated : Aug 13, 2023, 10:55 PM IST
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रतिक्रिया
सोलापूर -अजित पवार आणि माझी भेट ही गुप्त नाही. मी कुटुंबातील सर्वात ज्येष्ठ सदस्य आहे. तसेच अजित पवार हे माझे पुतणे आहेत. त्यामुळे अनेकजण मला भेटत असतात. त्यामुळे गुप्त बैठकीचा विषयच येत नसल्याचे शरद पवार यांनी (Sharad Pawar Ajit Pawar Secret Meeting) सोलापुरात सांगितले आहे.
शरद पवारांचे स्पष्टीकरण -अजित पवार हे माझे पुतणे आहेत. पवार कुटुंबात मी वडीलधारा व्यक्ती आहे. वडीलधाऱ्या माणसाला कोणी भेटायले आले आणि वडील माणसाने कुणाला भेटायला बोलावले तर हा चर्चेचा विषय होऊ शकत नाही, असे स्पष्टीकरण शरद पवार यांनी सांगोला येथे दिले. शेकापचे दिवंगत नेते गणपतराव देशमुख यांचा पुतळा अनावरणासाठी शरद पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे रविवारी दुपारी आले होते.
भाजपसोबत जाणार नाही - राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट नसल्याची माहिती मी निवडणूक आयोगाला कळवली आहे. निवडणूक आयोगाने प्रश्न विचारले, त्या नोटीसचे मी उत्तर दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकीय धोरणात भाजपाबरोबरची युती बसत नाही. त्यामुळं आम्ही कुणीही भाजपासोबत नाही. आमच्यातल्या काही सहकाऱ्यांनी वेगळी भूमिका घेतलेली आहे. त्याच्यात काही परिवर्तन होईल का असा प्रयत्न आमचे हितचिंतक करतात. त्यामुळे ते सुसंवाद साधायचा प्रयत्न करतात. पण, राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून भाजपासोबत जाणार नाही, असे शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. पंतप्रधान मोदींनी मणिपूरच्या बाबतीत संवेदनशील राहायला पाहिजे होते, असेही पवार यावेळी म्हणाले.
गुप्त बैठक नाही - पुण्यातील चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या उद्घाटनासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी पुण्यात आले होते. दुसरीकडे साखर उद्योगाच्या दृष्टीने महत्त्वाची संस्था असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री राजेश टोपे हे देखील पुण्यात आले होते. या दोन्ही कार्यक्रमानंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्यात (NCP Crisis) पुण्यातील कोरेगाव पार्क येथील उद्योगपती चोरडिया (Sharad Pawar Ajit Pawar Meeting) यांच्या निवासस्थानी गुप्त भेट झाल्याची माहिती मिळत होती. मात्र, आता याला शरद पवार यांनी दुजोरा दिला आहे. मात्र, ही गुप्त बैठक नसल्याचेही शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.
शरद पवारांच्या घरी भेट - मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर तीनवेळा अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी अजित पवार 14 जुलैला शरद पवार यांच्या घरी गेले होते. तिथे त्यांची शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासोबत भेट झाली होती. मात्र, काकींच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आलो होतो. तिथे राजकीय चर्चा झाली नसल्याची प्रतिक्रिया त्यावेळी अजित पवार यांनी दिली होती.
वायबी येथे दोनवेळा शरद पवारांची भेट - राष्ट्रवादीत बंड केल्यानंतर अजित पवार उपमुख्यमंत्री झाले, तर अन्य आठ आमदार हे मंत्री झाले. त्यानंतर पहिल्याच पावसाळी अधिवेशनाच्या दोन दिवस आधी अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांची वायबी चव्हाण सेंटर येथे अचानक भेट घेतली होती. तर लगेच त्याच्या दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादीच्या इतर बंडखोर आमदारांना घेऊन अजित पवार यांनी दुसऱ्यांना शरद पवार यांची वायबी चव्हाण सेंटर येथे भेट घेतली होती. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी यावेळी शरद पवार यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केली होती. तर यातून मार्ग काढण्याची विनंती राष्ट्रवादीच्या बंडखोर नेत्यांनी शरद पवार यांच्याकडे केली होती, अशी माहिती त्यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी दिली होती.
शरद पवारांचा मास्टरस्ट्रोक? - राष्ट्रवादीत बंड झाल्यानंतर हा विषय निवडणूक आयोगाकडे गेला होता. त्यावेळी दोन्ही गटांनी वेगवेगळे पत्र निवडणूक आयोगाला दिले होते. आमच्या गट नसून, एकच पक्ष असल्याचे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात म्हटले होते. तर मी भाजपासोबत जाणार नसल्याची प्रतिक्रियाही त्यावेळी शरद पवार यांनी दिली होती. तर लगेचच लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्यात शरद पवार आणि पंतप्रधान मोदी हे एकाच मंचावर आले होते. तर पहाटेच्या शपथविधीलाही शरद पवार यांची सहमती होती. त्यामुळे शरद पवार हे कधी काय डाव खेळतील हे सांगता येणार नाही.