पंढरपूर - कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' ही मोहिम सुरू केली आहे. या मोहिमेअतंर्गत पंढरपूर शहरातील 96 हजार 238 व ग्रामीण क्षेत्रातील 3 लाख 51 हजार 71 असे एकूण 4 लाख 47 हजार 309 नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' ही मोहिम 15 सप्टेंबर 2020 पासून केली आहे. या मोहिमेअतंर्गत प्रशासनाच्या वतीने तालुक्यातील शहरी भागात 17 व ग्रामीण भागात 165 आरोग्य पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. आरोग्य तपासणीसाठी नियुक्त केलेले पथक शहरात प्रत्येक वार्डातील दररोज 50 घरांना तर ग्रामीण भागातील प्रत्येक गावांतील दररोज 50 घरांना भेटी देवून कुटुंबातील प्रत्येक नागरिकांची आरोग्य तपासणी करीत आहेत.