सोलापूर - मंगळवेढा नगरपरिषदेच्या शाळेच्या पहिल्या मजल्यावरील काही भाग कोसळला आहे. सकाळी प्रार्थना सुरू असताना काही भाग कोसळल्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मंगळवेढा नगर परिषदेच्या शाळेचा काही भाग कोसळला, सुदैवाने जीवित हानी नाही
मंगळवेढा शहरातील नगरपालिका कन्या शाळा क्रमांक एकच्या शाळेत ही घटना घडली आहे. दरम्यान, या घटनेनंतर नगर पालिका प्रशासनाचा निष्काळजीपणा जबाबदार असल्याचा आरोप करत पालकांनी संताप व्यक्त केला आहे.
मंगळवेढा नगरपालिकेची मुलींची शाळा क्रमांक एक ही दोन मजली इमारत असून खुप जूनी इमारत आहे. मंगळवेढा शहरात बँक ऑफ इंडियाच्या जवळ ही शाळा असून जवळपास शंभर वर्ष जुनी शाळेची इमारत आहे. या शाळेत विद्यार्थ्यांना न बसवता इतरत्र हलवावे यासंदर्भातील पत्रव्यवहार झालेला आहे. मात्र, याच ठिकाणी शाळा भरवण्यात येते शाळेची इमारत ही खूप जुनी असल्यामुळे शाळेच्या पहिल्या मजल्यावरील काही भाग कोसळला आहे.
सकाळी सात वाजता शाळेची सामूहिक प्रार्थना सुरू होती. सर्व वर्गातील विद्यार्थी हे सामूहिक प्रार्थनेसाठी बाहेर असतानाच शाळेच्या पहिल्या मजल्यावरील भाग कोसळला. त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही