करमाळा (सोलापूर) -माढाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, आमदार राहुल कुल यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथेभेट घेतली. या भेटीत कोरोनासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी राज्यपालांनीतातडीने लक्ष घालावे, अशी विनंती त्यांनी यावेळी केली. देशातील कोरोनाच्या रुग्णांपैकी 40 टक्के रुग्ण हे एकट्या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि त्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे यावेळी राज्यपालांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.
कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यात महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारहेअत्यंत बेफिकीर दिसत आहे. दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर बनत चालली असताना राज्य सरकारने कोणतेही ठोस निर्णय घेतलेले दिसत नाहीत. मोलमजुरी करणाऱ्यांचा प्रश्न, कोरोना रुग्णांच्या संदर्भामध्ये हॉस्पिटलमध्ये असणारी दुरवस्था, रेशनवाटप, व्यवसाय सुरू करणे याबाबतीत सरकारमध्ये कसलाही समन्वय नाही. लोकप्रतिनिधी व प्रशासन हे एकमेकांच्या विरोधामध्ये निर्णय घेताना दिसत आहेत, या बाबी राज्यपालांसमोर मांडण्यात आल्या.