सोलापूर- अकलूजच्या निहाल बागवान या विराचा एव्हरेस्टची चढाई मोहीम फत्ते करून परतल्यावर ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. निहालसोबत आणखी 3 गिर्यारोहक होते, त्यांचादेखील ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्याने मृत्यू झाला आहे. ही घटना गुरुवारी सांयकाळी घडली आहे.
श्वसनाच्या त्रासामुळे निहालचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अकलूज येथील निहाल बागवानच्या घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. मात्र गिरी, शिखरे पादाक्रांत करण्याची त्याची जिद्द मोठी होती. अकलूजच्या मोहिते पाटलांसह अनेक व्यक्ती, सामाजिक संस्थांच्या आर्थिक सहकार्यामुळे निहालने एव्हरेस्ट सर करण्याचे स्वप्न पूर्णही केले. मात्र त्याने पूर्ण केलेल्या स्वप्नांचा आनंद जास्त काळ टिकला नाही. खाली उतरताना काही तासांतच त्याचा मृत्यू झाला.
गुरुवारी 23 मे रोजी निहालने एव्हरेस्ट शिखर सर केले. शिखर सर करून परतलेल्या निहाल बागवानवर नातेवाईक, मित्र मंडळी यांनी कौतुकाचा वर्षाव केला होता. सर्वोच्च शिखर सर केल्याचा आनंद फार काळ टिकला नाही. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे बेस कॅम्प 4 वरच निहालचा मृत्यू झाला.