महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उमेदवारीपेक्षा प्रतिस्पर्ध्याला पाडा; म्हणूनच वाढला माढ्याचा तिढा

बहुचर्चीत माढा मतदार संघात गटबाजीला उधान....राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार विजयसिंहाची राष्ट्रवादीकडूनच कोंडी... भाजपचा पर्याय ठेवत राष्ट्रवादीला हिसका दाखण्याची मोहिते पाटलांकडून तयारी...

माढ्याचा तिढा

By

Published : Mar 19, 2019, 9:38 AM IST

Updated : Mar 19, 2019, 12:17 PM IST

सोलापूर- माढा लोकसभा मतदारसंघातील राजकारण आता टोकाला पोहोचले आहे. या ठिकाणी स्थानिक राजकीय स्पर्धेमुळे जिंकणाऱ्या उमेदवारापेक्षा प्रतिस्पर्ध्याला पाडा, अशा विचारांच्या गटबाजीला उधाण आले आहे. एका अर्थाने सोलापूर जिल्ह्यात फोडा आणि राज्य करा या नितीचे राजकारण करणाऱ्या अजित पवार आणि शरद पवारांच्या भूमिकेचा डाव आता उलटा पडल्याचे चित्र सध्या माढ्यात पाहायला मिळत आहे. त्यामुळे माढ्याच्या उमेदवारीवरून पुन्हा एकदा शरद पवार विरुद्ध मोहिते-पाटील असे चित्र निर्माण झाले आहे. या सर्व घडामोडीत काहीही झाले तरी फटका राष्ट्रवादीलाच बसणार आहे.

अकलूजचे माहिते-पाटील आणि बारामतीच्या पवारांचे राजकीय प्रेम कधी नैसर्गिक नव्हतेच, असे राजकीय जाणकार सांगतात. कारण त्याची मुळे या दोन्हीही मातब्बर राजकीय घराण्याच्या इतिहासात आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात मोहिते पाटील हे राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या गटाचे होते. तर शरद पवार हे वसंतदादांचे विरोधक. त्यामुळे या दोन्ही गटाच्या नेत्यांमध्ये सतत कुरघोड्याचे राजकारण सुरुच राहिले. पण वसंतदादांच्या निधनानंतर पवार आणि मोहित्यांमध्ये समेट झाला. मग राष्ट्रवादी निघाली. तरीही सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोहिते-पाटलांचा मोठा प्रभाव होता. म्हणूनच त्यांनी २००३ला दबावतंत्राचा वापर करून उपमुख्यमंत्री पद मिळवले. तर रणजितसिंह मोहिते-पाटीलांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून राज्यभर कार्यकर्त्यांचे जाळे विणले.

औरंगाबाद येथील मेळाव्यात खुद्द शरद पवार यांनी रणजीतसिंहांचा भावी मुख्यमंत्री, असा उल्लेख केला. मात्र, २००९ च्या विधानसभा निवडणुकीत मोहिते पाटलांचा माळशिरस मतदारसंघ राखीव झाल्यावर त्यांनी पंढरपूर-मंगळवेढ्यातून विधानसभा लढवली. त्यात उपमुख्यमंत्री असलेल्या विजयसिंह मोहिते पाटलांचा पराभव झाला. त्यानंतर मात्र पवारांनी मोहिते पाटलांच्या समर्थकांना आपल्या गटात सामील करून मोहित्यांच्याच विरोधात उभे केले, त्यांना बळ दिले. त्यातून सोलापूर जिल्ह्याच्या डिसीसी बँक, दुधसंघ, जिल्हा परिषद या सत्ताकेंद्रांत बंडखोरांनी चेकमेट दिला.

माढ्याचा तिढा

पण तरीही मोहिते पाटलांनी संयमाचे राजकारण केले. त्याच दरम्यान २०१९ ला माढ्यातून शरद पवार लोकसभेवर गेले. पण २०१४ ला देशात मोदी लाट आल्यावर पवारांनी माढ्यातून पुन्हा विजयसिंह मोहिते-पाटील यांना मैदानात उतरविले. तेव्हा नेहमीप्रमाणे विरोधकांनी राजकारण करत स्वाभिमानीच्या सदाभाऊ खोत यांना मदत केली. पण तरीही मोहिते-पाटलांनी माळशिरस तालुक्याच्या अस्मितेवर ही निवडणूक जिंकली. आता विद्यमान खासदार असतानाही पुन्हा त्यांच्या विरोधकांना सक्रिय करून मोहिते-पाटलांची कोंडी करण्याचा प्रयत्न होतो आहे.

या राजकीय कोंडीवर मोहिते पाटलांनीही आता भाजपचा पर्याय समोर ठेवत शरद पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीला हिसका दाखवाची तयारी केली आहे. त्यातच पवारांचा सोलापूर जिल्ह्यातील हस्तक्षेप जाणलेल्या मतदारांनी सावध प्रतिसाद दिला. शिवाय २००९ च्या आश्वासनांचे काय झाले? असा प्रश्न उपस्थित झाल्याने शरद पवार यांनी मावळ मधील पार्थ पवारांच्या उमेदवारीचा मुद्दा उपस्थित करत माढ्यातून आतातरी माघार घेतलीय. मग पवारच नाहीत म्हटल्यावर राष्ट्रवादीत मोहिते-पाटील अन् त्यांच्या बंडखोर विरोधकांनी परस्परांच्या विरोधात शड्डू ठोकल्याने माढ्याचा तिढा वाढत चालला आहे. या निवडणुकीत गटा-तटापेक्षा पक्षीय राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसचेच नुकसान होणार आहे, ही काळ्या दगडावरची रेघ म्हणावी लागेल.

Last Updated : Mar 19, 2019, 12:17 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details