सोलापूर- जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक मोठी वाढ होत आहे. तसेच या रोगामुळे मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. याची विविध कारणमीमांसा करण्यासाठी आणि वाढत असलेला मृत्यूदर कसा कमी करता येईल, याबाबत आमदार प्रणिती शिंंदे यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, सोलापूर महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता संजय ठाकूर यांच्यासोबत संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत कोरोनाच्या उपाययोजने संदर्भात चर्चा करण्यात आली.
गंभीर अवस्थेतील कोरोना रुग्णांची प्रकृतीमध्ये सुधारणा होण्यासाठी (Tocilizumab) टोसिलिझुम्याब इंजेक्शनची आवश्यकता आहे. या इंजेक्शनाचा तुटवडा असल्याचे अधिष्ठाता संजय ठाकूर यांनी आमदार शिंदे यांना सांगितले. तेव्हा शिंदे यांनी वैद्यकीय शिक्षण व संशोधन, संचालक तात्यासाहेब लहाने यांना फोन करून सोलापुरातील परिस्थितीची माहिती दिली. तसेच त्यांनी ताबडतोब टोसिलिझुम्याब इंजेक्शन उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली. लहाने यांनी देखील तत्काळ इंजेक्शन उपलब्ध करुन दिले.