पंढरपूर (सोलापूर) -राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने धनगर आरक्षणाचा प्रश्न तातडीने निकालात काढावा, अन्यथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या मुंबईतील घरासमोर ढोल बजाओ आंदोलन केले जाईल, असा इशारा भाजप आमदार तथा धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी आज पंढरपुरात दिला.
..तर उद्धव ठाकरे अन् शरद पवारांच्या घरासमोर ढोल बजाओ आंदोलन करणार, पडळकरांचा इशारा - आमदार गोपीचंद पडळकर
राज्य सरकारने धनगर आरक्षणाचा प्रश्न तात्काळ निकाली न काढल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्री व राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे मुंबईतील निवासस्थान सिल्वर ओक समोर ढोल बजाओ आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजपचे आमदार व धनगर नेते गोपीचंद पडळकर यांनी पंढरपुरात दिला.
धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण द्यावे, या मागणीसाठी आज राज्यभरात राज्य सरकारच्या विरोधात 'ढोल बजावो सरकार जगाओ' आंदोलन करण्यात आले. पंढरपुरातही भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली चंद्रभागा वाळवंटात सरकारविरोधात ढोल वाजवून आंदोलन केले.
धनगर समाज बांधवांनी आज सकाळपासूनच आंदोलनासाठी चंद्रभागा नदीकाठावर मोठी गर्दी केली होती. हातात पिवळे ध्वज घेवून आणि भंडाऱ्याची उधळण करत आंदोलकांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. आंदोलनामध्ये गावागावातून आलेले हजारो धनगर बांधव ढोल वाजवत आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. ढोलाच्या निनादाने चंद्रभागेचा तीर दुमदूमून गेला होता. हजारो कार्यकर्त्यांनी आरक्षणाची मागणी करत, राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.
आंदोलनमध्ये अहिल्या देवी होळकर यांचे वंशज भुषणसिंह राजे होळकर, धनगर आरक्षण समितीचे प्रा. सुभाष मस्के, माऊली हळणवर, संजय माने आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.आंदोलना दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पंढरपूर शहरात व आंदोलनस्थळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.