सोलापूर - कोरोना महामारीने सोलापूर जिल्ह्यातही तोंड वर काढले आहे. सर्वत्र थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ३ मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. तसेच यात्रा, जत्रा, विवाह समारंभ यासह सर्वच गर्दीच्या कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर उत्तर सोलापूर तालुक्यातील तिऱ्हे गावची प्रसिद्ध म्हसोबा यात्राही रद्द करण्यात आली आहे. याबाबतचे पत्रक काढून यात्रा पंचकमिटीने माहिती दिली आहे.
कोरोना महामारीला रोखण्यासाठी प्रशासानाकडून सर्वोतपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यानुसार सोलापूर जिल्हा प्रशासनाने सर्व धार्मिक कार्यक्रम रद्द करण्याचे आदेश दिले होते. याच आदेशाचे पालन करत तिऱ्हे गावची श्री क्षेत्र म्हसोबा यात्राही रद्द करण्यात आली आहे. १ मे २०२० या दिवशी म्हसोबा यात्रा पार पडणार होती. मात्र कोरोनाची महामारी आणि यात्रेला होणारी गर्दी याचा विचार करता यंदा ही यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याचे पंच कमिटीकडून सांगण्यात आले. या संदर्भात तहलीसदार यांना पत्रक देण्यात आले आहे.
म्हसोबा यात्रेला तिऱ्हे पंचक्रोशीतील हजारो नागरिक उपस्थित राहतात. या यात्रेला शेकडो बोकड कापले जात असल्यानेही मटन खाणाऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. तसेच म्हसोबा देवस्थान पंचक्रोशीत प्रसिद्ध असल्याने या ठिकाणी येणाऱ्या भाविकांचे प्रमाण बहुसंख्य आहे. प्रतिवर्षी अक्षय तृतीयेनंतर येणाऱ्या पहिल्या शुक्रवारी ही यात्रा भरवली जाते. यंदाही ही यात्रा होणार की नाही असा नागरिकांमध्ये संभ्रम होता, त्यामुळे पंचकमिटीने यात्रा रद्द करण्यात आल्याचे पत्रक काढून जनतेला माहिती दिली आहे. तसेच लॉकडाऊन काळात नागरिकांनी यात्रेदिवशी घरात राहावे, स्वत:ची काळजी घ्यावी. विनाकारण बाहेर फिरू नये असे आवाहनही तिऱ्हे गावातील सामाजिक कार्य करणारी संस्था सिद्धीविनायक प्रतिष्ठान यांच्यावतीने करण्यात आले आहे.
सोलापूर जिल्ह्यात सध्या एकूण ४१ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ४ जणांना मृत्यू झाला आहे. कोरोनाचा हा प्रादुर्भाव सध्या केवळ महापालिका क्षेत्रातच फैलावला आहे. ग्रामीण भागात याचा शिरकाव झाला नाही. तरीही नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.