पंढरपूर(सोलापूर)-गेल्या दीड वर्षापूर्वी कोरोना संसर्गामुळे शाळा आणि महाविद्यालये बंद आहेत. या काळात काही तरुणांनी आपले छंद जोपसण्यासह आपल्यातील सुप्त कलागुणांना प्रत्यक्षात सादर करण्यावर भर दिला. पंढरपुरातील एका वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या पायल पवार हिने रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर भावा-बहिन्याच्या नात्याला आणखी आनंददायी बनवण्यासाठी पारंपरिक आणि आकर्षक अशी राखी बनवली आहे. पंढरपुरी खणचोळी राखी असे पारंपरिक नाव असलेल्या या राखीला मोठ्याप्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे.
पारंपरिक पद्धतीवर जोर
गेल्या दीड वर्षापासून कोरोनामुळे पायल पवार ही घरी आहे. अशातच अवघ्या काही महिन्यांवर रक्षाबंधन सण येऊन ठेपल्याने तिने पारंपरिक पंढरपुरी राख्या बनविण्याचा निर्णय घेतला. या राख्या बनवत असताना तिने पारंपरिक पद्धतीवर जोर दिला यामध्ये साधा चोळीचा खण, लाल धागा, मणी आदी किरकोळ साहित्याचा वापर केला आणि पंढरपुरी खणचोळी नावाची आकर्षक राखी बनवली. खणचोळीचा वापर करून त्या राख्यांना पारंपरिक पद्धतीचा टच देणारी राखी ही खूपच आकर्षक दिसते. त्यानंतर या पंढरपुरी राख्या तिने समाजमाध्यामातून नागरिकांपुढे प्रसिद्धीस आणल्या आणि तेवढ्याच प्रमाणात तिच्या या पंढरपुरी खणचोळी राखीची मागणीही वाढली. सोशल माध्यमातूनही प्रचंड असा प्रतिसाद मिळत असल्याने ही राखी अवघ्या काही क्षणांत प्रसिद्ध झाली आहे.