पंढरपूर (सोलापूर) - मराठा आरक्षणाला सर्वोच्चा न्यायालयात स्थगिती मिळाल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्यानंतर वेगवेगळ्या मार्गाने आंदोलनाचे सत्र सुरूच असतानाच आता सकल मराठा समाजाच्या वतीने ७ नोव्हेंबरला पंढरपूर- ते- मुंबई आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. पंढरपूर येथील नामदेव पायरी जवळ विठ्ठलाच्या चरणी नसमस्तक होऊन मराठा आक्रोश मोर्चाच सुरुवात होणार आहे. हा आक्रोश मोर्चा पायी दिंडीच्या माध्यमातून काढण्यात येणार आहे.
मराठा क्रांती ठोक मोर्चाने आज पत्रकार परिषदेत घेतली त्यावेळी राज्य समन्वयक धनंजय साखळकर यांनी या आंदोलनाची घोषणा केली. तसेच सरकारने किती दबाव टाकला तरीही आता माघार घेणार नसल्याचा पवित्रा मराठा समाजाने घेतला आहे. आता ऐन दिवाळीत मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावेळी महेश डोंगरे, दीपक वादडेकर, किरण घाडगे, संदीप मांडवे, स्वागत कदम, सतीश शिंदे, अर्जुन चव्हाण, संदीप मुटकुळे उपस्थित होते.