पंढरपूर -न्यायालयातील पोटगीचा दावा काढून घेण्यासाठी १० लाख रूपयांचा तगादा लावत पत्नीसह सासरच्या मंडळींनी पतीला व मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच पत्नी, सासू, सासरा, मेव्हणा व पत्नीचा मामा यांच्या त्रासामुळे व सततच्या पैशाच्या मागणीच्या त्रासाला कंटाळून स्वप्नील उत्तम शिरदाळे (वय ३६ रा. सरगरवाडी नाझरा ता. सांगोला) याने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, आत्महत्या करण्यापूर्वी त्याने माझ्या मृत्यूस पत्नीसह तिचे नातेवाईकच जबाबदार आहेत, असे मेसेज व्हाट्सअपद्वारे घरातील नातेवाईकांसह मित्रांना पाठवून गळफास घेतला. ही घटना सोमवारी २ तारखेला सकाळी ९ च्या सुमारास घडली.
पत्नीसह सासरच्या मंडळींनी पोटगीचा तगादा लावल्याने पतीची आत्महत्या, मृत्यूपूर्वी केलेले मेसेज व्हायरल - आत्महत्या बातमी सांगोला
सांगोला तालुक्यात एका व्यक्तीने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली आहे. पत्नीसह सासरच्या लोकांनी पोटगीसाठी तगादा लावला होता. तसेच मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली होती.
याप्रकरणी भावाने दिलेल्या तक्रारीवरून स्वप्निल यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी म्रृताची पत्नी पूजा स्वप्निल शिरदाळे, सासू कस्तुराबाई मल्लिकार्जुन बुरकुल, सासरा मल्लिकार्जुन तुकाराम बुरकुल, मेव्हणा तुकाराम मल्लिकार्जून बुरकुल सर्व (रा.आंधळगाव ता. मंगळवेढा) तसेच पत्नीचा मामा चंदू पाटील (रा.धर्मगाव ता. मंगळवेढा) यांच्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
सरगरवाडी येथील स्वप्निल उत्तम शिरदाळे याची पत्नी पूजाने मंगळवेढा न्यायालयात स्वप्निल याच्याविरुद्ध पोटगीचा दावा दाखल केला. हा दावा काढून घेण्यासाठी सप्टेंबर २०१८ ते सोमवार २ ऑक्टोंबर २०२० पर्यंत पत्नी पूजा स्वप्निल शिरदाळे, सासु कस्तुराबाई मल्लिकार्जुन बुरकुल, सासरे मल्लिकार्जुन तुकाराम बुरकुल, मेव्हणा तुकाराम मल्लिकार्जून बुरकुल सर्वजण (रा. आंधळगाव) व मामा चंदू पाटील धर्मगाव (ता. मंगळवेढा) यांनी संगनमत करून वारंवार स्वप्निल यास नातेवाईकांवर केस करण्याची धमकी देवून व न्यायालयातील पोटगीचा दावा काढून घेण्यासाठी १० लाख रुपयाची मागणी करून तगादा लावला होता. तसेच त्यांनी पैसे आण नाहीतर तुला व तुझ्या मुलीला मारून टाकतो असे धमकी दिली होती. अशा प्रकारे शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासाला कंटाळून स्वप्नील उत्तम शिरदाळे याने २ नोव्हेंबरला सकाळी शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
आत्महत्या करण्यापूर्वी स्वप्निल याने आईसह नातेवाईक, मित्राच्या मोबाईलवर बायको पूजा, सासू, सासरा, मेहुणा व बायकोचा मामा चंदू पाटील यांच्या त्रासाला व सततच्या पैशाच्या मागणीमुळे आत्महत्या करीत आहे. हे सर्व मृत्यूस जबाबदार आहेत असा मेसेज व्हाट्सअपवर पाठवला.
याप्रकरणी भाऊ प्रकाश शिरदाळे राहणार सरगरवाडी नाझरा यांनी सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी स्वप्निल यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नी, सासू, सासरा, मेहुणा व पत्नीचा मामा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.