सोलापूर- जगातील सर्वोच्च शिखरांपैकी असलेले युरोपातील सर्वोच्च शिखर 'माउंट एलब्रूस' सर करण्यासाठी महाराष्ट्रातील गिर्यारोहक निघाले आहेत. एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली 360 एक्सप्लोररमार्फत या मोहिमेत अनेक विक्रम होणार आहेत. त्यामुळे स्वातंत्र्य दिनी तिरंगा फडकवण्याचा चंग सह्याद्रीच्या लेकरांनी उचलाल आहे. यात 10 वर्षाचा साई कवडे हा मूळचा पुणे येथील गिर्यारोहक हे शिखर सर करून सर्वात लहान गिर्यारोहक होण्यासाठी सज्ज झाला आहे.
मोहीम सह्याद्रीच्या लेकरांची -माउंट एलब्रूस हे शिखर सर करणारा 10 वर्षाचा साई कवडे हा आशिया खंडातील सर्वात लहान मुलगा ठरणार आहे. याशिवाय लिंगाणा फक्त 16 मिनिटात सर करणारा विक्रमवीर कोल्हापूर येथील सागर नलावडे, पोलीस दलातील सातारा येथील तुषार पवार, किलीमांजारो सर करणारा पहिला स्टेट बँक कर्मचारी भूषण वेताळ हेही या मोहिमेअंतर्गत शिखर सर करणार आहेत.
'मोहीम सह्याद्रीच्या लेकरांची' असे या मोहिमेला नाव दिले असून या मोहिमेचे नेत्तृत्व एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे हे करणार आहेत. आनंद बनसोडे यांनी 2014 मधेच हे शिखर सर करून अनेक विक्रम केले होते.
रशियामध्ये असलेले युरोपमधील सर्वोच्च शिखर माउंट एल्ब्रूस, या शिखराची उंची १८ हजार ५१० फुट असून काळा समुद्र व कॅस्पियन समुद्राच्यामध्ये हे शिखर वसलेले आहे. जॉर्जिया देशाच्या बोर्डरपासून २० किमी अंतरावर माउंट एल्ब्रूस शिखर असून पृथ्वीवरील सर्वात उंच असेल्यांपैकी एक असा हा निद्रिस्त ज्वालामुखी पर्वत आहे. याचे तापमान उणे 25 डिग्रीपर्यंत जात असते. वर्षभर सततची सुरू असलेले मोठ-मोठी वादळे माउंट एल्ब्रूस चढाईतील मुख्य अडचण आहे. पण, 10 वर्षाचा साई कवडे हा मूळचा पुणे येथील गिर्यारोहक हे शिखर सर करून सर्वात लहान आशियाई बनणार असून यांसाठी संपूर्ण महाराष्ट्राचे या मोहिमेकडे लक्ष लागून राहणार आहे.