सोलापूर- शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचा गड कायम राखण्यात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांना यश आलं आहे. त्यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी एआयएमआयएमच्या फारूक शाब्दी यांचा 12 हजार 971 मतांनी पराभव केला. शिंदे यांना 50 हजार 971 मते मिळाली तर शाब्दींना 38 हजार 254 मते मिळाली. त्याचबरोबर अपक्ष महेश कोठे, शिवसेनेचे उमेदवार दिलीप माने आणि सीपीएमचे कॉ. नरसय्या आडम यांचा दारुण पराभव झाला.
सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांचा विजय होताच त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. सात रस्ता परिसरातल्या शिंदे यांच्या जनवात्सल्य निवासस्थानाला यात्रेचं स्वरूप आलं. ढोल-ताशांच्या गजरात गुलालाची मुक्तहस्ताने उधळण करत कार्यकर्त्यांनी पक्षाचा झेंडा उंचावून जल्लोष केला.