महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विशेष : सततच्या टाळेबंदीमुळे शेतीमालाचे नुकसान, माल विकायचा कुठे? शेतकऱ्यांसमोर प्रश्न - solapur lockdown

सततच्या टाळेबंदीमुळे शेतात उत्पादित होणारा नाशवंत शेतीमाल विक्री कसा आणि कुठे करायचा? हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे.

lockdown effect on farmers
टाळेबंदीमुळे शेतीमालाचे नुकसान

By

Published : Jul 22, 2020, 7:22 PM IST

सोलापूर- शेतात उत्पादित झालेला शेतीमाल विक्रीसाठी शेतकऱ्यांना सध्या मोठा अडचणींचा सामना करावा लागत आहे. कोरोनाची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये व प्रमुख शहरात टाळेबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला त्यांचा नाशवंत शेतीमाल विकायचा कुठे? असा प्रश्न सध्या शेतकऱ्यांना सतावतोय. पाहुयात 'ई टीव्ही भारत'चा विशेष वृत्तांत...

सततच्या टाळेबंदीमुळे शेतीमालाचे नुकसान

मागील चार महिन्यापासून राज्यासह संपूर्ण देशात कोरोनाचा आकडा वाढत आहे. कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता पुन्हा नव्याने राज्यातील अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये टाळेबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. सततच्या टाळेबंदीमुळे शेतात उत्पादित होणारा नाशवंत शेतीमाल विक्री कसा आणि कुठे करायचा? हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे.

टाळेबंदीमुळे शेतीमालाचे नुकसान

दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तरसंग या गावातील महादेव नरोनी यांची अडीच एकर डाळिंबाची बाग आहे. मागील वर्षी चांगला झालेला पाऊस आणि शेतात घेतलेले कष्ट यामुळे डाळिंबाची बाग चांगली आली. सध्या महादेव नरोनी यांच्या शेतातील डाळिंब हे विक्रीसाठी तयार झाले आहेत. मात्र, सोलापूर शहरात दहा दिवसाचा लॉकडाऊन पुकारण्यात आल्यामुळे सोलापूर शहरातील बाजार समिती देखील बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे विक्रीसाठी आलेले डाळिंब विकायचे कुठे? हा मोठा प्रश्न नरोनी यांच्यासमोर उभा राहिला आहे. लोकं नसल्यामुळे डाळिंब खरेदी करायला देखील व्यापारी तयार नाहीत. या बागेतून या शेतकऱ्याला चार लाख रुपये उत्पन्न अपेक्षित होते, त्या बागेला सात हजार रुपये द्यायला व्यापारी तयार झाला आहे. व्यापाऱ्याच्या पाठीमागे लागून देखील व्यापारी माल घेऊन जात नाही आणि डाळिंब खरेदीचा निर्णय हा लॉकडाऊन उठल्यावर पाहूयात, असा निरोप व्यापाऱ्याकडून दिला जात आहे. त्यामुळे आता विक्रीसाठी आलेल्या डाळिंबाचे करायचे काय? हा मोठा प्रश्न महादेव नरोनीसारख्या अनेक शेतकऱ्यांना पडला आहे.

सततच्या टाळेबंदीमुळे शेतीमालाचे नुकसान

शेतात वर्षभर कष्ट करून डाळिंबाचे पीक हाताशी आले. पीकही जोमदार आले, मात्र सततच्या लॉकडाऊनमुळे आणि बाजारपेठा बंद असल्यामुळे शेतीमाल हा कवडीमोल दराने विकावा लागत आहे. तर दुसरीकडे ग्राहकाला मात्र तोच शेतीमाल चढ्या दराने खरेदी करावा लागतो, अशी खंत उच्चशिक्षित असलेल्या सागर नरोनी यांनी व्यक्त केली आहे.

बाजारात दर मिळत नाही ही अवस्था फक्त डाळिंबाची आहे असे नाही, तर याच गावातील अमर पाटील या तरुण शेतकऱ्यांने केळीची बाग लावली होती. मागील वर्षी ज्या केळीला 25 रुपये प्रति किलो दर मिळाला, हिच केळी लॉकडाऊनमुळे 10 ते 12 रुपये प्रति किलो दराने विकावी लागली असल्याचे अमर बिराजदार यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details