पंढरपूर -कार्तिकी वारी निमित्ताने विठ्ठल मंदिर समितीकडून विठ्ठल मंदिराचे महाद्वार, रुक्मिणी द्वार, पश्चिम द्वार या प्रमुख प्रवेशांच्या ठिकाणी आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. त्याशिवाय संपूर्ण मंदिर परिसर, तुकाराम भवन, दर्शन मंडपदेखील या रोषणाईने उजळून गेला आहे. आकर्षक पद्धतीने उंची झुंबर, पडदे लावत आले. यामुळे विठ्ठल मंदिराचे रूपडे पालटले आहे.
मंदिर परिसरात आकर्षक रोषणाई
कोरोना महामारीमुळे कार्तिक वारी सोहळा साध्या पद्धतीने करण्यात येणार आहे. मात्र मंदिर समितीकडून विठ्ठल मंदिराच्या आतील बाजूसदेखील आकर्षक रोषणाई करण्यास सुरुवात केली आहे. विठ्ठल सभामंडप या आकर्षक रोषणाईने झगमगू लागला आहे. नामदेव पायरीजवळ अतिशय आकर्षक पद्धतीने एलईडी दिव्यांच्या माळा वापरुन रोषणाई करण्यात आली आहे. मंदिराची शिखरे आणि मंदिरावर विविध रंगांच्या दिव्यांचे फोकस मारण्यात आल्याने विठ्ठल मंदिर अत्यंत मनमोहक दिसत आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते होणार पुजा
पंढरपुरात कार्तिकी यात्रा निमित्ताने दोन दिवस संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. यामध्ये भाविकांना पंढरीत येण्यास बंदी घालण्यात आली आहे. विठ्ठलाची शासकीय पूजा एकादशीच्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे.