सोलापूर - उन्हाळ्याची दाहकता कमी करण्यासाठी उजनीतून ४०० ते ३ हजार क्युसेकने पाणी सोडण्यात येणार आहे. सध्या ४०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्हा तीव्र दुष्काळाच्या छायेत असल्याने उन्हाळी पिकांना दिलासा देण्यासाठी पाणी सोडण्यात आले आहे.
रब्बी हंगामचे पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे दुष्काळाच्या तीव्र समस्या सोसणाऱ्या सोलापूर जिल्हावासियांना कांहीसा दिलासा मिळाला आहे. डाव्या आणि उजव्या कालव्यातून सुरुवातीला २०० क्यूसेकने आणि नंतर जवळपास ३ हजार क्युसेकने हे पाणी सोडण्यात येणार आहे.
भर पावसाळ्यात संभाव्य दुष्काळाची चाहूल लागताच उजनी जलव्यवस्थापन समितीने दूरदृष्टीने धरणातील पाणी राखीव ठेवले होते. सुरुवातीला २ जानेवारी, मग २० जानेवारीला पाण्याचे आवर्तन ठरले होते. पण दुष्काळाच्या तोंडावर सावध झालेल्या शेतकऱ्यांनी पाणी उन्हाळ्याच्या तोंडावर म्हणजे २० फेब्रुवारीला सोडण्याची मागणी केली होती.
त्याला जलसंपदा आणि जिल्हा प्रशासनाने साथ देत पाणी उन्हाळ्यासाठी राखून ठेवले. धरणातील पाणीसाठा स्थिर राहिला, आणि त्याचा फायदा सोलापूरकरांना उन्हाळ्यात होणार आहे.
सध्या उजनी धरणात २०.३९ टक्के पाणीसाठा आहे. त्यातील उपयुक्त पाणीसाठा हा १० टक्के आहे. दहिगाव उपसा सिंचन योजना, सीना-माढा उपसा सिंचन योजना, बोगदा आणि आता कालव्याने पाणी सोडल्याने धरण या महिन्याभरात वजा टक्क्यांवर जाईल. त्यानंतर मात्र पाणी जपून वापरावे लागणार आहे. सध्याची एकूण पाणी पातळी ही ४९२.५०० मीटर इतकी आहे. एकूण जलसाठा २ हजार ११२.६५ दशलक्ष घनमीटर इतका आहे. त्यापैकी ३०९.७० दलघमी हा उपयुक्त जलसाठा आहे. त्यामुळे उजनी जलसिंचन विभागाच्यावतीने पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.