पंढरपूर -उजनी जलाशयातून इंदापूर तालुक्याला पाच टीएमसी पाणी देण्याचा आदेश रद्द केला आहे. त्याची तोंडी नको तर लेखी स्वरुपात अध्यादेश काढा, या मागणीसाठी जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख यांचे नेतृत्वाखाली भिमानगर येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. त्याचवेळी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. यामुळे उजनी संदर्भातील आंदोलन आता उद्रेक होत असल्याचे दिसून येत आहे.
उजनी संदर्भातील राज्य शासनाने लेखी आदेश घ्यावा -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उजनी जलाशयातून इंदापूर तालुक्यातील 22 गावांसाठी पाच टीएमसी पाणी देण्यासाठी मंजुरी दिली होती. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी व इतर संघटनेने या निर्णयाच्या विरोधात तीव्र आंदोलन केले होते. त्या आंदोलनाची दखल घेत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी पाच दिवसापूर्वी 5 पाच टीएमसी बाबत घेतलेला निर्णय रद्द करत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर पाच दिवस उलटून गेल्यानंतरही राज्य सरकारकडून कोणत्याही प्रकारचा अध्यादेश काढण्यात आला नाही. त्यामुळेच भैया देशमुख यांच्या नेतृत्वाखाली उजनी येथील भीमा नगर परिसरात बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. सोमवारी शेतकरी संघटनेकडून जलसंपदामंत्री पाटील यांच्या प्रतिआत्मक पुतळ्याचे दहन करून बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.
हेही वाचा -'बाजार बंद करा' म्हणताच, फळ विक्रेत्यांनी केला पोलिसांवर हल्ला, डोक्यात दगड घालण्याचा प्रयत्न