सोलापूर- पक्षातील मातब्बर नेते राष्ट्रवादीला राम राम ठोकत असताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नव्याने पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून अजित पवार शुक्रवारी आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहेत.
अजित पवारांच्या उपस्थितीत शुक्रवारी सोलापुरात इच्छुकांच्या मुलाखती - जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे-पाटील
अजित पवार शुक्रवारी आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहेत.
यापूर्वी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या ज्या इच्छुकांनी विधानसभेसाठी इच्छुक म्हणून अर्ज दाखल केले आहेत. त्यांच्या मुलाखती शुक्रवार 26 जुलैला राष्ट्रवादीचे जिल्हा प्रभारी अजित पवार आणि निरीक्षक सुरेश घुले यांच्या उपस्थितीत होणार आहेत. या मुलाखती रामलाल चौकातील राष्ट्रवादी भवनात होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे-पाटील, शहराध्यक्ष भारत जाधव आणि कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी दिली आहे. सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत राष्ट्रवादी भवनात प्रथम शहर आणि त्यानंतर जिल्ह्यातील इच्छुकांच्या मुलाखती होणार आहेत.
विधानसभेसाठी अर्ज केलेल्या इच्छुकांनी समर्थकांसोबत येताना परिचय पत्र आणावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. यानिमित्ताने राष्ट्रवादी पुन्हा एकदा आपल्या ताकदीचा अंदाज बांधत जिंकून येण्याची क्षमता असणाऱ्या उमेदवारांची चाचपणी करणार आहे.